Petrol कार्सच्या तुलनेत Diesel कार्स जास्त मायलेज का देतात? जाणून घ्या यामागील विज्ञान...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 19:27 IST2026-01-14T19:26:51+5:302026-01-14T19:27:40+5:30
नवीन कार खरेदी करताना प्रत्येकजण कारच्या मायलेजचा विचार करतो.

Petrol कार्सच्या तुलनेत Diesel कार्स जास्त मायलेज का देतात? जाणून घ्या यामागील विज्ञान...
नवी कार खरेदी करताना बहुतांश ग्राहकांचा पहिला प्रश्न असतो, मायलेज किती मिळेल? विशेषतः डिझेल आणि पेट्रोलकार्सची तुलना करताना एक गोष्ट वारंवार ऐकू येते की, Diesel Cars या Petrol Cars पेक्षा जास्त मायलेज देतात. मग सिटी ड्रायव्हिंग असो किंवा लांब पल्ल्याचा प्रवास, डिझेल कार्स अधिक इंधन-कार्यक्षम मानल्या जातात. यामागे केवळ इंधनाची किंमत किंवा इंजिनचा आकार कारणीभूत नसून, डिझेल इंधनाची रचना आणि इंजिनची कार्यपद्धती हे प्रमुख घटक आहेत.
डिझेल कार्स मायलेजमध्ये पुढे का असतात, हे समजून घेण्यासाठी खालील तीन महत्त्वाची कारणे जाणून घेणे आवश्यक आहे.
1) डिझेल इंधनात अधिक ऊर्जा
डिझेल कारला जास्त मायलेज मिळण्यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे, डिझेल इंधनातील जास्त ऊर्जा घनता. पेट्रोलच्या तुलनेत डिझेलमध्ये प्रति लिटर अधिक ऊर्जा असते. याचा अर्थ असा की, तेवढ्याच इंधनात डिझेल इंजिन अधिक अंतर कापू शकते. त्यामुळे कमी इंधनात लांब प्रवास शक्य होतो आणि मायलेज आपोआप वाढते. साध्या भाषेत सांगायचे तर, डिझेल इंधन अधिक ‘पॉवरफुल’ असते.
2) जास्त कॉम्प्रेशन रेशो
डिझेल इंजिन्स हे पेट्रोल इंजिन्सपेक्षा जास्त कॉम्प्रेशन रेशोवर काम करतात.
पेट्रोल इंजिन्स: साधारणतः 8:1 ते 12:1
डिझेल इंजिन्स: 20:1 किंवा त्याहून अधिक
जास्त कॉम्प्रेशनमुळे इंधन अधिक परिणामकारकरीत्या आणि पूर्णपणे जळते. इंधनाचा पुरेपूर वापर झाल्याने प्रत्येक थेंबातून अधिक ऊर्जा मिळते, ज्याचा थेट परिणाम मायलेज वाढण्यात होतो.
3) कॉम्प्रेशन इग्निशन तंत्रज्ञान
पेट्रोल इंजिनमध्ये इंधन पेटवण्यासाठी स्पार्क प्लगची आवश्यकता असते. मात्र, डिझेल इंजिनमध्ये प्रक्रिया वेगळी असते. डिझेल इंजिनमध्ये हवा प्रचंड दाबली जाते, त्यामुळे तिचे तापमान इतके वाढते की, डिझेल इंधन आपोआप पेटते. यालाच कॉम्प्रेशन इग्निशन म्हणतात. या तंत्रज्ञानामुळे इंधन जळण्यावर अधिक नियंत्रण मिळते, इंधनाची नासाडी कमी होते, परिणामी जास्त मायलेज मिळते.