सहा महिने थांबा...! ईलेक्ट्रीक गाड्या पेट्रोल गाड्यांच्या किंमतीत मिळणार; गडकरींची मोठी घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 09:00 IST2025-03-21T09:00:07+5:302025-03-21T09:00:26+5:30
गेल्या काही वर्षांपासून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी दोन मोठे दावे करत आले आहेत. एक म्हणजे जेवढे अंतर कापाल तेवढेच पैसे अशी टोल प्रणाली आणि दुसरा म्हणजे पेट्रोल आणि ईलेक्ट्रीक कारच्या किंमती एकसमान.

सहा महिने थांबा...! ईलेक्ट्रीक गाड्या पेट्रोल गाड्यांच्या किंमतीत मिळणार; गडकरींची मोठी घोषणा
गेल्या काही वर्षांपासून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी दोन मोठे दावे करत आले आहेत. एक म्हणजे जेवढे अंतर कापाल तेवढेच पैसे अशी टोल प्रणाली आणि दुसरा म्हणजे पेट्रोल आणि ईलेक्ट्रीक कारच्या किंमती एकसमान. यापैकी पेट्रोल आणि ईव्ही वाहनांच्या किंमती एकसमान होण्याचा मुहूर्त जवळ आला आहे. कारण आता गडकरींनी सहा महिन्यांत हे होणार असल्याची घोषणा केली आहे.
येत्या सहा महिन्यांत इलेक्ट्रीक गाड्या आणि पेट्रोल गाड्यांची किंमत एकसारखी असणार आहे, असे गडकरींनी म्हटले आहे. ३२ व्या कन्व्हर्जन्स इंडिया आणि १० व्या स्मार्ट सिटीज इंडिया एक्स्पोला गडकरी संबोधित करत होते. २१२ किमी लांबीच्या दिल्ली-डेहराडून एक्सेस-नियंत्रित एक्सप्रेसवेचे बांधकाम वेगाने सुरू असून ते पुढील तीन महिन्यांत पूर्ण होईल, असे सांगितले.
चांगल्या रस्त्यांच्या बांधकामामुळे देशातील लॉजिस्टिक्सचा खर्च कमी होईल, ज्यामुळे उद्योग आणि व्यापाराला चालना मिळेल, असे त्यांनी सांगितले. याचबरोबर सरकार विद्युत उर्जेवर चालणाऱ्या सार्वजनिक वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी वेगाने काम करत आहे, असेही ते म्हणाले.
रस्ते बांधणीचा खर्च कमी करण्यासाठी नवीन तंत्रज्ञान आणि नवोपक्रमांचा अवलंब करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. सरकार स्मार्ट शहरे आणि स्मार्ट वाहतुकीला प्राधान्य देऊन चांगल्या कनेक्टिव्हिटी आणि शाश्वत पायाभूत सुविधांवर काम करत आहे. सरकारच्या या उपक्रमामुळे भविष्यात इलेक्ट्रिक वाहनांचा अवलंब वाढेल आणि प्रदूषणही कमी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अधिवेशन संपताच, आम्ही एक नवीन टोल धोरण जाहीर करू, ज्यामुळे ही समस्या सुटेल आणि ग्राहकांना वाजवी सवलती मिळतील. यानंतर टोलबाबत कोणताही वाद राहणार नाही, असे ते म्हणाले.