Volvo: 'या' इलेक्ट्रिक कारमध्ये आग लागण्याची शक्यता; कंपनी म्हणते, "गाड्या परत आणून द्या!"
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 12:36 IST2026-02-25T12:34:25+5:302026-02-25T12:36:15+5:30
Volvo EX30 Recall: जगभरात इलेक्ट्रिक वाहनांच्या मागणीत झपाट्याने वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आघाडीची कार उत्पादक कंपनीने संभाव्य आगीचा धोका लक्षात घेऊन ग्राहकांना गाड्या परत आणून देण्याच आवाहन केले आहे.

Volvo: 'या' इलेक्ट्रिक कारमध्ये आग लागण्याची शक्यता; कंपनी म्हणते, "गाड्या परत आणून द्या!"
जगभरात इलेक्ट्रिक वाहनांच्या मागणीत झपाट्याने वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीर स्वीडनची आघाडीची कार उत्पादक कंपनी व्होल्वोने आपल्या ग्राहकांना त्यांची लोकप्रिय इलेक्ट्रिक एसयूव्ही एक्स ३० परत आणून देण्याचे आवाहन केले आहे. बॅटरीशी संबंधित संभाव्य आगीच्या धोक्यामुळे कंपनीने हे पाऊल उचलले आहे. परंतु, यामुळे ४० हजारांहून अधिक ग्राहकांना त्रास होण्याची शक्यता आहे.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीने मागवण्यात आलेल्या व्होल्वो ईएक्स३० इलेट्रिक एसयूव्हीच्या एकूण ४० हजार ३२३ युनिट्सचा समावेश आहे, ज्यात सिंगल-मोटर एक्सटेंडेड रेंज आणि ट्विन-मोटर परफॉर्मन्स व्हेरिएंटचा समावेश आहे.
कंपनीने काय म्हटले?
कंपनी म्हणते की हाय-व्होल्टेज बॅटरी पॅक जास्त गरम होण्याचा धोका आहे, ज्यामुळे आग लागण्याची शक्यता आहे. व्होल्वोने स्पष्ट केले आहे की, ते या परत मागवल्यामुळे प्रभावित झालेल्या सर्व वाहन मालकांशी वैयक्तिकरित्या संपर्क साधत आहे. ग्राहकांची सुरक्षा ही त्यांची सर्वोच्च प्राथमिकता आहे. बॅटरी मॉड्यूल बदलेपर्यंत, व्होल्वोने ग्राहकांना सावधगिरीचा सल्ला दिला आहे. महत्त्वाचे म्हणजे, ग्राहकांना एकही रुपया खर्च करावा लागणार नाही, कंपनी फुकटात बॅटरी मॉड्यूल बदलून देणार आहे.
ग्राहकांना मोलाचा सल्ला
कंपनीने ग्राहकांना त्यांची ईएक्स ३० कार मोकळ्या जागेत पार्क करण्याचा आणि कारची बॅटरी फक्त ७० टक्क्यांपर्यंत चार्ज करण्याचा सल्ला दिला आहे, जेणेकरून कोणताही संभाव्य धोका कमी होईल. बॅटरी जास्त चार्ज केल्याने सेल गरम होतात आणि आगीचा धोका वाढतो. खुल्या जागेत पार्किंग केल्याने धोका टाळता येऊ शकतो.