ऑटो मार्केटमध्ये भूकंप! चिनी लोकांनीच BYD, गिलीकडे पाठ फिरवली; फॉक्सवॅगनच्या कारवर तुटून पडले लोक...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 11:41 IST2026-03-17T11:41:41+5:302026-03-17T11:41:59+5:30
Volkswagen vs Geely China Sales: चीनच्या कार मार्केटमध्ये फॉक्सवॅगनने बाजी मारली आहे. गीली आणि फॉक्सवॅगनमध्ये अवघ्या ०.१% चा फरक. टोयोटा तिसऱ्या क्रमांकावर. वाचा सविस्तर.

ऑटो मार्केटमध्ये भूकंप! चिनी लोकांनीच BYD, गिलीकडे पाठ फिरवली; फॉक्सवॅगनच्या कारवर तुटून पडले लोक...
जगातील सर्वात मोठी ऑटोमोबाईल बाजारपेठ असलेल्या चीनमध्ये गेल्या दोन वर्षांपासून असलेले स्थानिक कंपन्यांचे वर्चस्व आता मोडीत निघाले आहे. २०२६ च्या पहिल्या दोन महिन्यांच्या आकडेवारीनुसार, जर्मन कार उत्पादक फॉक्सवॅगनने चिनी दिग्गज BYD ला मागे टाकत पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावले आहे. २०२४ आणि २०२५ मध्ये अव्वल स्थानी असलेल्या BYD च्या विक्रीत मोठी घट होऊन ती चौथ्या स्थानावर घसरली आहे.
BYD च्या घसरणीची प्रमुख कारणे
चिनी सरकारने इलेक्ट्रिक वाहनांवरील खरेदी कर सवलत बंद केली असून ५% खरेदी कर पुन्हा लागू केला आहे. याचा सर्वाधिक फटका बजेट ईव्हीवर अवलंबून असलेल्या BYD ला बसला. फेब्रुवारी २०२६ मध्ये BYD च्या विक्रीत वार्षिक ३४% ते ६४% पर्यंतची विक्रमी घसरण नोंदवली गेली. कोविड काळानंतरची ही कंपनीची सर्वात खराब कामगिरी मानली जात आहे.
हायब्रिड गाड्यांची वाढती मागणी
ईव्हीवरील सवलती कमी झाल्यामुळे ग्राहक आता टोयोटासारख्या कंपन्यांच्या हायब्रिड गाड्यांकडे वळत आहेत.
फॉक्सवॅगन आणि टोयोटाची पुनरागमन
फॉक्सवॅगनने स्थानिक कंपन्यांसोबत (FAW आणि SAIC) केलेल्या भागीदारीमुळे आपली पकड पुन्हा मजबूत केली आहे. तसेच यावर्षी फॉक्सवॅगन चीनमध्ये २० हून अधिक नवीन इलेक्ट्रिक मॉडेल्स लाँच करण्याच्या तयारीत आहे.
फॉक्सवॅगन (Volkswagen): १३.९ टक्के मार्केट शेअरसह फॉक्सवॅगनने चीनमध्ये पहिले स्थान पटकावले आहे.
गीली (Geely): फॉक्सवॅगननंतर दुसऱ्या क्रमांकावर 'गीली' ही चिनी कंपनी आहे. गीलीचा मार्केट शेअर १३.८ टक्के असून फॉक्सवॅगन आणि गीलीमध्ये अतिशय कमी फरक आहे.
टोयोटा (Toyota): तिसऱ्या क्रमांकावर जपानी दिग्गज टोयोटा असून, ७.८ टक्के मार्केट शेअरसह त्यांनी आपली पकड मजबूत ठेवली आहे.
बीवाईडी (BYD): गेल्या काही वर्षांपासून अव्वल स्थानी असलेली चिनी कंपनी BYD आता थेट चौथ्या क्रमांकावर घसरली असून त्यांचा मार्केट शेअर केवळ ७.१ टक्के उरला आहे.