झाले आता TVS iCube ही पेटली! ते पण आपल्या कोल्हापुरात; एकटी ओला उगाच बदनाम झाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 09:00 IST2026-01-14T08:59:07+5:302026-01-14T09:00:33+5:30
TVS icube Fire Kolhapur Video: इलेक्ट्रीक स्कूटरची क्रांती जेव्हा सुरु झाली तेव्हा ओलाच्या स्कूटरला आग लागल्याने ओला बदनाम झाली होती. यानंतर बजाज चेतक, एथरचा तर अख्खा शोरुमचा जळाला होता. अशा सर्वच छोट्या मोठ्या ब्रँडच्या स्कूटर पेटल्या होत्या.

झाले आता TVS iCube ही पेटली! ते पण आपल्या कोल्हापुरात; एकटी ओला उगाच बदनाम झाली...
अनेक लोक पैसे वाचविण्यासाठी महागड्या ईलेक्ट्रीक स्कूटर घेत आहेत. परंतू, या स्कूटर अनेकदा आगीच्या गोळ्यात रुपांतरीत होत आहेत. आता कोणताच असा ब्रँड राहिलेला नाही ज्याची स्कूटर पेटलेली नाही. काल कोल्हापुरच्या करवीरमध्ये टीव्हीएस आयक्यूब देखील आगीच्या ज्वाळा ओकताना दिसली आहे. याचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
इलेक्ट्रीक स्कूटरची क्रांती जेव्हा सुरु झाली तेव्हा ओलाच्या स्कूटरला आग लागल्याने ओला बदनाम झाली होती. यानंतर बजाज चेतक, एथरचा तर अख्खा शोरुमचा जळाला होता. अशा सर्वच छोट्या मोठ्या ब्रँडच्या स्कूटर पेटल्या होत्या. टीव्हीएसच्या देखील स्कूटरला आगी लागल्याचे व्हिडीओ युट्यूब, सोशल मीडियावर आलेले आहेत. ताज्या घटनेत कोल्हापुरात टीव्हीएस आयक्युब आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहे.
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर उचगाव (ता. करवीर) हद्दीत एक भीषण घटना घडली. चालत्या दुचाकीने अचानक पेट घेतल्याने गाडी जळून खाक झाली. हॉटेल मॅकडोनाल्ड समोर घडलेल्या या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती आणि वाहनधारकांमध्ये मोठी घबराट पसरली होती. मिळालेल्या माहितीनुसार, निवास यमगर (रा. उचगाव) हे गोकुळ शिरगाव एमआयडीसी परिसरात वायरिंगची कामे करतात. नेहमीप्रमाणे आपली कामे आटोपून ते त्यांच्या दुचाकीवरून घराकडे परतत होते. महामार्गावरून जात असताना अचानक त्यांच्या दुचाकीतून धूर निघू लागला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून यमगर गाडीवरून खाली उतरले आणि काही क्षणातच दुचाकीने रौद्र रूप धारण केले.
वाहनधारकांची उडाली भंबेरी भररस्त्यात दुचाकीने पेट घेतल्याने आगीच्या ज्वाळा लांबपर्यंत दिसत होत्या. यामुळे महामार्गावरून येणाऱ्या-जाणाऱ्या इतर वाहनचालकांनी आपली वाहने लांब उभी केली. स्थानिकांनी तातडीने अग्निशमन दलाला पाचारण केले. मात्र, अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी पोहोचेपर्यंत दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाली होती. या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र निवास यमगर यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.