आजच्या घडीला जगातील सर्वात जास्त रेंज देणारी ईलेक्ट्रीक कार कोणत्या कंपनीची? टेस्ला, बीवायडी, टाटा, महिंद्रा... अशी काही नावे तुमच्या डोक्यात रेंगाळतील. पण नाही. ल्युसिड एअर कंपनीच्या कारने एका चार्जमध्ये १२०७ किमी अंतर कापत वर्ल्ड रेकॉर्ड केले आहे.
या कारने जवळपास युरोपमधील तीन देशांतून प्रवास केला. ल्युसिड एअरच्या ग्रँड टुरिंग मॉडेलने स्वित्झर्लंडच्या सेंट मॉरिजहून प्रवास सुरु केला तो जर्मनीच्या म्युनिखपर्यंत. एका चार्जमध्ये या कारने ७५० मैलांचे अंतर कापले. या प्रवासात कार एकदाही चार्ज केली गेली नाही.
अर्थात हे सर्वांनाच शक्य नाही. कारण ही कार जर तुम्हाला, आम्हाला आणून दिली तरी आपण ती साधारण ७००-८०० किमीच्या आसपास नेऊ शकू. ही किमया केली आहे, लंडनमधील उद्योगपती उमित सबांसी यांनी. त्यांना हायपर-मिलिंग तज्ञ म्हणून या जगात ओळखले जाते. ल्युसिड कंपनीला आता गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सचा ट्रॉफी मिळणार आहे. ३ देशांच्या नॉन-स्टॉप प्रवासात विविध प्रकारचे रस्ते समाविष्ट होते, यात डोंगरांगा देखील होत्या, उतार, वळणेवळणे देखील होती. हा खड्डे मात्र नव्हते. पण अरुंद रस्ते होते.
या प्रवासात रिजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टम खूप महत्वाची ठरली, यामुळे जास्त रेंज मिळाली. ल्युसिड एअर ग्रँड टूरिंग मॉडेलची किंमत दोन कोटींच्या आसपास आहे. ही कार ८३१ हॉर्सपॉवर एवढी ताकद निर्माण करते आणि १.८९ सेकंदात ०-१०० किमी प्रतितास वेग घेऊ शकते. या कारचा टॉप स्पीडच २७० किमी प्रतितास पेक्षा जास्त आहे.