टेस्लाला मोठा झटका, VinFast बनली EV मार्केटची 'महाराणी'! आता असा आहे इलॉन मस्क यांच्या फ्यूचर प्लॅन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 13:42 IST2025-12-10T13:37:07+5:302025-12-10T13:42:58+5:30
टेस्ला कारच्या कमी विक्रीची महत्वाची कारणे काय...? असा आहे टेस्लाचा फ्यूचर प्लॅन...

टेस्लाला मोठा झटका, VinFast बनली EV मार्केटची 'महाराणी'! आता असा आहे इलॉन मस्क यांच्या फ्यूचर प्लॅन
जगातिक पातळीवर आपली एक वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या टेस्ला या अमेरिकन कार कंपनीला भारतासारख्या खंडप्राय देशात अद्याप हवे तसे यश मिळालेले नाही. भारतीय बाजारात उतरल्यापासून टेस्लाला आतापर्यंत केवळ १५७ कार्सचीच विक्री करता आली आहे. भारताची क्षमता बघता टेस्लाची ही विक्री फारच कमी आहे. टेस्लाच्या तुलनेत, सप्टेंबर महिन्यात विक्री सुरू केलेल्या व्हिएतनामच्या 'विनफास्ट' (VinFast) ने केवळ नोव्हेंबर महिन्यातच ३६२ कार्सची विक्री केली. तर टेस्लाची कट्टर स्पर्धक असलेली BYD ही चिनी कंपनी दरमहा ५०० हून अधिक इलेक्ट्रिक कार्सची विक्री करते.
महत्वाचे म्हणजे, सरकारी 'वाहन' पोर्टलच्या आकडेवारीनुसार, नोव्हेंबर महिन्यात टेस्लाने केवळ ४८ कार्सची डिलिव्हरी केली आहे. हे प्रमाण बीएमडब्ल्यू (BMW) आणि मर्सिडीज-बेंझ (Mercedes-Benz) सारख्या लक्झरी ब्रँड्सपेक्षा फारच कमी आहे. एकट्या बीएमडब्ल्यूचा विचार करता, या कंपनीने केवळ नोव्हेंबर महिन्यातच २६७ इलेक्ट्रिक कार्सची विक्री केली.
टाटा मोटर्स पहिल्या स्थानावर -
भारतातील इव्ही बाजारपेठेत सध्या टाटा मोटर्स ७३१५ कार्सच्या विक्रीसह पहिल्या क्रमांकावर आहे. यानंतर, एमजी, महिंद्रा, ह्युंदाई, किया आणि BYD यांसारख्या कंपन्यांचा क्रमांक लागतो. या यादीत टेस्ला थेट १०व्या क्रमांकावर आहे. हिचे मॉडेल Y अद्याप प्रीमियम सेगमेंटमध्ये स्वतःचे स्थान मजबूत करू शकलेले नाही.
टेस्ला कारच्या कमी विक्रीची महत्वाची कारणे -
- महागड्या किमती
- आयात केलेल्या कार्सवर भारतात मोठा कर लागतो, यामुळे किमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर.
- कंपनीचा भारतात कोणताही स्थानिक प्लांट नाही.
- बाजारात उपलब्ध असलेले इतर स्वस्त पर्याय
- अपुरे चार्जिंग नेटवर्क
यांमुळे ग्राहक टेस्ला खरेदीपासून दूर असल्याचे दिसते.
असा आहे टेस्लाचा फ्यूचर प्लॅन -
आपली स्थिती मजबूत करण्यासाठी टेस्लाने गुरुग्राममध्ये पहिले 'ऑल-इन-वन' सेंटरही सुरू केले आहे. येथे शोरूम, डिलिव्हरी आणि सर्व्हिस एकाच ठिकाणी मिळेल. कंपनी आता सुपरचार्जर नेटवर्क आणि डायरेक्ट सेल्स मॉडेलवर लक्ष केंद्रित करत आहे.