'टेस्ला मॉडेल Y' भारतात २० लाखांनी स्वस्त होणार? कंपनीचा मोठा दावा, किंमत नाही, मालकी खर्च कमी होणार...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 16:00 IST2025-11-26T15:59:37+5:302025-11-26T16:00:10+5:30
Tesla Car Price, Ownership Cost news: भारतीय बाजारात पाय रोवण्यासाठी टेस्ला आपल्या कारच्या किंमती कमी करण्याचा मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे.

'टेस्ला मॉडेल Y' भारतात २० लाखांनी स्वस्त होणार? कंपनीचा मोठा दावा, किंमत नाही, मालकी खर्च कमी होणार...
अमेरिकेची इलेक्ट्रिक कार उत्पादक कंपनी टेस्ला भारतीय बाजारात मोठी झेप घेण्याच्या तयारीत आहे. सध्या उच्च किमतीमुळे विक्रीत अपेक्षित यश न मिळणाऱ्या टेस्लाने आता भारतीय ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एक महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केली आहे.
टेस्लाचे भारतातील महाव्यवस्थापक शरद अग्रवाल यांनी रॉयटर्स या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, पुढील चार ते पाच वर्षांत, मॉडेल Y कारची एकूण मालकी किंमत भारतीय ग्राहकांसाठी सध्याच्या किमतीपेक्षा एक-तृतीयांशने (सुमारे ३३%) कमी होईल, अशी कंपनीला अपेक्षा आहे.
याचाच अर्थ टेस्लाची कार २० लाखांनी स्वस्त होणार नाही तर तिचा सर्व्हिस व इतर मेन्टेनन्सचा खर्च, पेट्रोलवरील बचतीचा पैसा यातून दिलासा मिळणार आहे. म्हणजेच टेस्लाचा वापरण्याचा खर्च कमी होणार आहे. टेस्लाच्या मते, टेस्लाच्या इलेक्ट्रिक गाड्यांचा देखभाल खर्च पेट्रोल किंवा डिझेल गाड्यांपेक्षा खूप कमी असतो. मॉडेल Y ला घरी चार्ज करण्याचा खर्च हा पेट्रोलच्या खर्चाच्या दहावा भाग असतो. यामुळे ४ ते ५ वर्षांत ग्राहकांना सुमारे २० लाख रुपयांपर्यंत (अंदाजे) मोठी बचत करता येणार आहे.
सध्या टेस्लाच्या कारची किंमत भारतात जास्त आहे. टेस्लाच्या एंट्री-लेव्हल मॉडेल Y ची किंमत ६० लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, कारण आयात शुल्क खूप जास्त आहे (काही वाहनांवर १००% पर्यंत). त्यामुळे भारतातील सरासरी EV किंमत (सुमारे २२ लाख रुपये) च्या तुलनेत टेस्लाची कार तिप्पट महाग आहे.