टाटाने Nexon EV विकल्या पण स्पेअर पार्टच मिळत नाहीत...; चार्जिंग गन जोडतात तेच अॅक्च्युएटर फॉल्टी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 13:08 IST2025-09-26T13:07:17+5:302025-09-26T13:08:58+5:30
Tata Nexon EV Owners in Trouble: Tata Nexon EV मालक त्रस्त! चार्जिंग ॲक्च्युएटर (Actuator) खराब; पण सर्व्हिस सेंटरकडे स्पेअर पार्टच नाहीत. जाणून घ्या मुंबईतील गंभीर स्थिती.

टाटाने Nexon EV विकल्या पण स्पेअर पार्टच मिळत नाहीत...; चार्जिंग गन जोडतात तेच अॅक्च्युएटर फॉल्टी
काही वर्षांपूर्वी पेट्रोल, डिझेलचे दर आणि महागाईमुळे कारच्या किंमती वाढताच टाटा कंपनीच्या इलेक्ट्रीक गाड्यांची नुसती धुम निघाली होती. सुरुवातीला नेक्सॉन ही कार टाटाने इलेक्ट्रीकमध्येही आणली होती. या नेक्सॉनच्या जिवावर कंपनी इलेक्ट्रीक वाहन क्षेत्रातील टॉपची कंपनी बनली होती. परंतू, या गाड्यांमध्ये एवढ्या समस्या होत्या की ज्या ग्राहकांनी मोठ्या अपेक्षेने या गाड्या घेतल्या ते पुरते बेजार झाले आहेत. टाटाच्या या इलेक्ट्रीक गाड्यांमध्ये वारंवार समस्या येत आहेत. महत्वाचे म्हणजे टाटाकडून स्पेअर पार्टही उपलब्ध केले जात नाहीत, हे या ग्राहकांचे सर्वात मोठे दुखणे झालेले आहे.
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली अभिनेत्रीची नवीन कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
टाटा नेक्सॉन ईव्हीच्या अॅक्च्युएटर जो चार्जिंग गन एन्गेज करण्यासाठी अतीमहत्वाचा पार्ट आहे, तोच मोठ्या संख्येने खराब होत आहे. चार्जिंग गन कारला जिथे चार्जिंग पोर्ट आहे तिथे लॉक आणि अनलॉक करण्यासाठी हा पार्ट खूप महत्वाचा आहे. ही गन जोवर लॉक होत नाही तोवर कारचे चार्जिंग सुरु होत नाही. यामुळे अनेक नेक्सॉन ईव्ही मालक त्रस्त झाले आहेत. या फॉल्टी पार्टमुळे या ईव्ही मालकांना वाटेतच अडकून बसावे लागत आहे.
नेक्सॉन ईव्ही मालकांनी सर्व्हिस सेंटरकडे मोठ्या प्रमाणावर तक्रारी करण्यास सुरुवात केली आहे. परंतू, या सर्व्हिस सेंटरकडे हे स्पेअर पार्टच उपलब्ध नाहीत. कंपनीच पाठवत नसल्याची तक्रार या सर्व्हिस सेंटरची आहे. मुंबईत जर हे हाल असतील तर महाराष्ट्रात, देशात किती हालत खराब असेल, असा प्रश्नही ईव्ही मालकांना पडला आहे. काही सर्व्हिस सेंटरमध्ये गाडी दुरुस्त करायलाही जागा उरलेली नाहीय, एवढी भीषण परिस्थिती सध्या टाटा सर्व्हिस सेंटरची आहे. नवी मुंबईतील एका सर्व्हिस सेंटरने ४५ अॅक्च्युएटरची मागणी टाटा कंपनीकडे नोंदविली होती, त्यांना केवळ ६ अॅक्च्युएटर पाठवून देण्यात आले आहेत. म्हणजेच उर्वरित ३९ ईव्ही मालकांनी आपली कार तशीच धुळ खात पार्किंगमध्ये नाहीतर जिथे अडकलीय तिथे ठेवून वाट पाहण्याची वेळ कंपनीने या वाहन मालकांवर आणली आहे.
मनवा नाईक काय बोलली...
टाटा कंपनीच्या या नेक्सॉन ईव्हीच्या वारंवार नादुरुस्तीबाबत मराठी अभिनेत्री मनवा नाईकने नुकतीच एक पोस्ट केली होती. यामध्ये तिने गाडी घेऊन सहा महिने झाल्याचे म्हटले होते. या सहा महिन्यांत सहावेळा या नेक्सॉन ईव्हीने सर्व्हिस सेंटरची वारी केल्याचेही तिने सांगत टाटाच्या एकूण विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. हाच त्रास टाटा नेक्सॉन ईव्ही मालक गेल्या चार-पाच वर्षांपासून सहन करत आहेत. तसेच टाटाने सर्व्हिस सुधारावी, स्पेअर पार्ट उपलब्ध करावेत आणि गाड्यांचे नादुरुस्त होण्याचे प्रकार कमी करावेत अशी मागणी टाटा ईव्ही ओनर्स करत आहेत.