सुझुकीने अखेर ईलेक्ट्रीक स्कूटर e-Access लाँच केली, ९५ किमी रेंजसाठी किंमत एवढी ठेवली की...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 09:41 IST2026-01-10T09:41:32+5:302026-01-10T09:41:40+5:30
Suzuki e-Access Electric Scooter Price: भारतीय गरजा नीट न ओळखल्याने होंडावर त्यांची ईलेक्ट्रीक स्कूटरचे उत्पादन बंद करण्याची वेळ आली आहे.

सुझुकीने अखेर ईलेक्ट्रीक स्कूटर e-Access लाँच केली, ९५ किमी रेंजसाठी किंमत एवढी ठेवली की...
नवी दिल्ली: भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रात इलेक्ट्रिक वाहनांची वाढती क्रेझ पाहून जपानची दिग्गज कंपनी सुझुकीने अखेर आपली बहुप्रतिक्षित इलेक्ट्रिक स्कूटर 'Suzuki e-Access' अधिकृतपणे लाँच केली आहे. नकोसे दिसणारे डिझाइन आणि अती किंमत यामुळे कितीही सज्ज असली ही स्कूटर ओला आणि टिव्हीएस सारख्या कंपन्यांना तगडी फाईट देणार की नाही हे येणारा काळच ठरविणार आहे.
भारतीय गरजा नीट न ओळखल्याने होंडावर त्यांची ईलेक्ट्रीक स्कूटरचे उत्पादन बंद करण्याची वेळ आली आहे. सुझुकीने ओला नाही किमान बजाज चेतक, टीव्हीएस आयक्यूब, एथर, हिरो विडा यासारख्या कंपन्यांच्या स्कूटरची किंमत पाहून आपल्या स्कूटरची किंमत ठेवायला हवी होती, परंतू तसे केलेले नाही. यामुळे ९५ किमीच्या रेंजसाठी कितीजण दोन लाख रुपये मोजणार हे लवकरच समजणार आहे.
किंमत १.८८ लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) निश्चित करण्यात आली आहे. या स्कूटरसोबत कंपनीने तब्बल ७ वर्षांची वॉरंटी आणि बाय-बॅक गॅरंटी देऊन ग्राहकांचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न केला आहे. सुझुकी e-Access ही भारतातील अशा मोजक्या स्कूटर्सपैकी एक आहे, ज्यामध्ये ३ kWh क्षमतेची LFP बॅटरी वापरण्यात आली आहे. सामान्य NMC बॅटरीच्या तुलनेत LFP बॅटरीचे आयुष्य जास्त असते आणि ती अधिक सुरक्षित मानली जाते.
प्रमुख वैशिष्ट्ये आणि परफॉर्मन्स:
रेंज: सिंगल चार्जमध्ये ९५ किमी (IDC) धावण्याचा दावा.
इंजिन आणि टॉर्क: ४.१ kW ची मोटर आणि १५ Nm टॉर्क, ज्यामुळे शहरात चालवताना उत्तम पिकअप मिळेल.
रायडिंग मोड्स: इको, राईड A आणि राईड B असे तीन मोड्स, सोबत रिव्हर्स असिस्ट आणि रिजनरेटिव्ह ब्रेकिंग.
मेंटनन्स-फ्री बेल्ट ड्राइव्ह: यामध्ये ७०,००० किमी किंवा ७ वर्षांपर्यंत देखभाल करण्याची गरज नसलेला बेल्ट ड्राइव्ह दिला आहे.
नवा रंग: बुकिंग सुरू झाल्याच्या निमित्ताने कंपनीने 'मॅट ब्लू विथ ग्रे' हा नवीन ड्युअल-टोन रंग सादर केला आहे.
किंमत आणि स्पर्धा: सुझुकीची स्कूटर महाग का?
१.८८ लाख रुपये ही किंमत पाहता, सुझुकी e-Access ही भारतातील सर्वात महागड्या मास-मार्केट इलेक्ट्रिक स्कूटर्सपैकी एक ठरली आहे. तिची स्पर्धा Ather 450 Apex (₹ १.९० लाख) आणि Simple One Gen 2 (₹ १.७० लाख) शी असेल. मात्र, बजाज चेतक (₹ १.२३ लाख) आणि TVS iQube (₹ १.५८ लाख) यांसारख्या प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेत ही स्कूटर बरीच महाग आहे.
खरेदीवर जबरदस्त ऑफर्स:
किंमत जास्त असली तरी सुझुकीने ग्राहकांसाठी काही आकर्षक ऑफर्स दिल्या आहेत: १. मोफत वॉरंटी: ८०,००० किमी किंवा ७ वर्षांची वाढीव वॉरंटी विनामूल्य. २. बाय-बॅक अश्युरन्स: ३ वर्षांनंतर ६०% बाय-बॅक गॅरंटी. ३. फ्लिपकार्टवर उपलब्धता: लवकरच ही स्कूटर फ्लिपकार्टवरही बुक करता येईल.