सिंपल वनने २०२१ मध्ये वात पेटविली, २०२६ मध्ये धमाका केला! ४०० किमी रेंजची स्कूटर लाँच...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 12:27 IST2026-01-06T12:27:00+5:302026-01-06T12:27:22+5:30
Simple Energy 400 km range scooter: ४०० किमी रेंजमुळे ज्यांना शहराबाहेर प्रवास करायचा आहे, त्यांच्यासाठी ही स्कूटर गेमचेंजर ठरू शकते.

सिंपल वनने २०२१ मध्ये वात पेटविली, २०२६ मध्ये धमाका केला! ४०० किमी रेंजची स्कूटर लाँच...
भारतीय इलेक्ट्रिक दुचाकी बाजारपेठेत खळबळ उडवून देण्यासाठी 'सिंपल एनर्जी' या स्टार्टअप कंपनीने आपली 'Gen 2' मॉडेलची श्रेणी सादर केली आहे. यामध्ये कंपनीने भारतातीली पहिली ४०० किमी रेंज देणारी इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केली आहे. पेट्रोल महागले होते तेव्हा २०२१ मध्ये सिंपल एनर्जी या कंपनीने ३२० किमी रेंजची स्कूटर आणणार असल्याचे जाहीर करून खळबळ उडवून दिली होती.
सिंपल एनर्जीने 'Simple One' मॉडेलला नवीन अवतारात सादर केले आहे. या नवीन Gen 2 सीरीजमध्ये ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार वेगवेगळे व्हेरियंट निवडता येतील. कंपनीने या बॅटरी पॅकमध्ये मोठी सुधारणा केली असून, हाय-रेंज व्हेरियंट एका पूर्ण चार्जवर तब्बल ४०० किलोमीटरचे अंतर कापण्यास सक्षम असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
४०० किमी IDC रेंजमुळे ही भारतातील सर्वाधिक रेंज देणारी स्कूटर ठरली आहे. नवीन जनरेशनच्या मोटरमुळे स्कूटरचा वेग आणि टॉर्कमध्ये सुधारणा झाली आहे. यामध्ये टचस्क्रीन डॅशबोर्ड, कनेक्टिव्हिटी फीचर्स आणि अधिक सुरक्षित बॅटरी मॅनेजमेंट सिस्टम (BMS) देण्यात आली आहे. स्कूटरचे डिझाइन अधिक स्पोर्टी आणि एरोडायनामिक करण्यात आले असून नवीन रंगांचे पर्याय उपलब्ध आहेत.
किंमत आणि उपलब्धता
सिंपल एनर्जीने आपल्या या नवीन रेंजची किंमत स्पर्धात्मक ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. ओला इलेक्ट्रिक आणि एथर एनर्जी सारख्या प्रस्थापित कंपन्यांना टक्कर देण्यासाठी सिम्पल एनर्जीने हे मोठे पाऊल उचलले आहे.
Simple One-S (एंट्री लेव्हल): कमी बजेटमध्ये उत्तम स्कूटर शोधणाऱ्यांसाठी हा पर्याय आहे. याची रेंज १९० किमी असून, मर्यादित कालावधीसाठी याची सुरुवातीची प्रभावी किंमत ₹१,३९,९९९ (एक्स-शोरूम, बेंगळुरू) ठेवण्यात आली आहे.
Simple One (४.५ kWh): या मॉडेलमध्ये २३६ किमीची रेंज मिळते. याची किंमत ₹१,६९,९९९ आहे.
Simple One (५ kWh): ज्यांना थोडी जास्त रेंज हवी आहे त्यांच्यासाठी २६५ किमी रेंजचा हा पर्याय असून याची किंमत ₹१,७७,९९९ आहे.
Simple One Long Range (४०० किमी): ही या सीरीजमधील सर्वात प्रीमियम स्कूटर असून ती एका चार्जवर तब्बल ४०० किमी (IDC) धावू शकते.