'सेकंड हॅन्ड' वाहने 'सुसाट'! ७० हजारांपासून दहा लाखांपर्यंतच्या गाड्या बाजारात
By दिपक दुपारगुडे | Updated: March 29, 2023 18:21 IST2023-03-29T18:21:27+5:302023-03-29T18:21:52+5:30
दिवसाला २५ लाखांची उलाढाल, सेकंड हॅन्ड गाड्यांचा बिजनेस 'फर्स्ट क्लास'

'सेकंड हॅन्ड' वाहने 'सुसाट'! ७० हजारांपासून दहा लाखांपर्यंतच्या गाड्या बाजारात
दीपक दुपारगुडे, सोलापूर: सध्या वाढत्या महागाईमुळे नवीन गाडी घेणे सर्वसामान्यांना आवाक्याबाहेर गेले आहे. त्यामुळे नागरिक कमी किमतीत सेकंड हॅण्ड चारचाकी वाहन खरेदी करण्यास प्राध्यान्य देतात. त्यामुळे जुन्या गाड्यांचा बाजार सध्या जोमात आहे. शहरामध्ये ५० पेक्षा अधिक सेकंड हॅन्ड गाड्यांचे विक्रेते असून दिवसाला २० ते ३० गाड्यांची विक्रीतून २५ ते ३० लाखांपर्यंतची उलाढाल होत असल्याचे वाहन विक्रेते व्यापाऱ्यांनी सांगितले.
सामान्यपणे कार घ्यायची म्हटले की, त्यासाठी मोठी आर्थिक तजवीज करावी लागते. सर्वसामान्य पर्याय म्हणजे नवी कार घेण्याऐवजी चांगल्या स्थितीतील सेकंड हॅन्ड कार घेणे पसंत केले जाते. कारण सेकंड हॅन्ड कार बजेटच्या हिशोबाने परवडणारी असते. म्हणून नव्या कारच्या तुलनेत जुन्या गाड्यांची विक्री सर्वाधिक होत आहे.
सेकंड हॅन्ड गाड्यांच्या या मार्केटमध्ये तुम्हाला प्रीमिअम हॅचबॅकपासून ते सेडान आणि स्पोर्ट युटिलिटी व्हेइकल (SUV) सुद्धा स्वस्तात खरेदी करता येतील. किमान १ वर्षापासून ते १० वर्षे जुन्या गाड्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत. गाडीची पूर्ण तपासणी केल्यानंतरच या गाड्या विकल्या जातात. सोबतच, या गाड्या खरेदी करताना फायनान्स सुविधादेखील उपलब्ध करून दिली जातात.
का वाढली मागणी?
कोरोना साथीच्या आजारामुळे सार्वजनिक वाहतूकही या क्षणी बंद झाली, तर काही लोकांना या अशा परिस्थिती स्वत:च्या गाडीने प्रवास करावासा वाटतो. त्यामुळेच सेकंड हॅन्ड गाड्यांची मागणी बऱ्यापैकी वाढली असल्याचे सेकंड हॅन्ड कारचे विक्रेत्यांनी सांगितले.