डॅशबोर्ड, स्टेअरिंगवर लावावा लागणार कुटुंबीयांचा फोटो; कारणही विचार करायला लावेल...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2019 17:02 IST2019-09-21T17:02:05+5:302019-09-21T17:02:31+5:30
अपघात झाल्यास मृत्यू किंवा अपंगत्व येते. याचा मोठा फटका अपघातग्रस्ताच्या कुटुंबियांना बसतो.

डॅशबोर्ड, स्टेअरिंगवर लावावा लागणार कुटुंबीयांचा फोटो; कारणही विचार करायला लावेल...
जयपूर : देशात वाहतुकीचे कडक नियम करण्यात आले आहेत. यामुळे वाहनचालकांमध्ये धास्ती असून इन्शुरन्स, पीयुसी, वाहनाची कागदपत्रे जवळ ठेवण्यात येत आहेत. मात्र, अपघातांची संख्या पाहता सरकार नानाविध क्लुप्त्या अवलंबत आहे. यापैकीच ही अनोखी क्लुप्ती राजस्थान सरकारच्या विचाराधीन आहे.
अपघात झाल्यास मृत्यू किंवा अपंगत्व येते. याचा मोठा फटका अपघातग्रस्ताच्या कुटुंबियांना बसतो. मृत्यू झालेला त्या कुटुंबाचा एकुलता एक कमविणारा असतो. त्याचे नुकतेच लग्न झालेले असते, किंवा वर्षा दोन वर्षांचे मूल असते. अशी प्रकरणे आजुबाजूला नेहमीच ऐकू येतात. यामुळे अपघातातून होणारे नुकसान लाखोंच्या भरपाईतूनही भरून काढता येत नाही. यामुळे वाहन चालकाला त्याच्या जबाबदारीचे भानच करून दिले तर, असा विचार राजस्थानच्या गहलोत सरकारने चालविला आहे.
वाहनामध्ये देवाची मूर्ती, फोटो चिकटवलेला असतो. ही श्रद्धा असते. मात्र, त्याचसोबत जर कुटुंबाचा फोटो लावला तर, वाहन चालक वेग वाढविताना किंवा नियम मोडताना एकदा विचार करेल. कारण त्याच्या समोर त्याचे कुटुंब दिसत असेल. यामुळे अपघात रोखण्यास मदत होईल असा विचार राजस्थान सरकार करत आहे.
देशभरात वर्षात दीड लाख अपघात होतात. यामध्ये तीन लाख लोक मृत्यू मुखी पडतात. यातील सर्वाधिक अपघात हे वाहनचालकाच्या बेजबाबदारपणामुळे घडतात. यामुळे त्याला त्याच्या डोळ्यासमोर कुटुंब दिसत असल्यास वाहन चालक अशाप्रकारे निर्णय घेणार नाही. यामुळे अपघातही कमी होतील.