ओलाच्या नावाने शिमगा केला, बजाज चेतक भररस्त्यात पेटली; इचलकरंजीत शोला बनला आग का गोला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 13:21 IST2025-09-09T13:20:23+5:302025-09-09T13:21:27+5:30
Bajaj Chetak Fire: कोल्हापुरमधील इचलकरंजीतून नुकताच एक व्हिडीओ येत आहे. सायंकाळच्या सुमारास बजाज चेतकने भररस्त्यावर पेट घेतला आहे.

ओलाच्या नावाने शिमगा केला, बजाज चेतक भररस्त्यात पेटली; इचलकरंजीत शोला बनला आग का गोला...
बजाज चेतक ही स्कूटर आता ग्राहकांच्या डोक्याला ताप बनलेली आहे. एकामागोमाग एक समस्यांनी ग्रस्त असलेली चेतक आता ओलाला देखील मागे टाकू लागली आहे. सर्व्हिस सेंटरला एकदा का बिघाड झालेली स्कूटर दिली की ती पार १५-२० दिवसांनीच मिळत आहे. अशातच ओलाच्या नावाने शिमगा करणाऱ्या राजीव बजाज यांची बजाज चेतक आता आगीच्या गोळ्यात रुपांतरीत होऊ लागली आहे.
कोल्हापुरमधील इचलकरंजीतून नुकताच एक व्हिडीओ येत आहे. सायंकाळच्या सुमारास बजाज चेतकने भररस्त्यावर पेट घेतला आहे. राजीव बजाज यांनी ओलाच्या स्कूटरना आगी लागल्याच्या घटनांवर तोंडसुख घेतले होते. ओलाचा आगीचा गोळा, आमची चेतक शोला असे म्हटले होते. परंतू, चेतकलाही आगी लागल्याचे प्रकार घडू लागले आहेत.
चेतकची सर्व्हिस अत्यंत वाईट आहे. गाड्या घेतल्यापासून ग्राहकांना सारखे समस्यांवर समस्या येत असल्याने सर्व्हिस सेंटर गाठावे लागत आहेत. एवढेच नाही तर बजाज चेतकचे स्पेअर पार्टही या सर्व्हिस सेंटरमध्ये उपलब्ध नसतात. कंपनीकडेच नाहीत, त्यांनी पाठविले की मिळतील असे सांगितले जात आहे. पुण्यात ही परिस्थिती आहे मग बाहेर काय असेल असाही एक प्रश्न आहे.
इचलकरंजीमध्ये विकास नगर भागात शुक्रवारी रात्री साडे नऊच्या सुमारास ही चेतक पेटली आहे. आता कंपनीने आपण या आगीच्या घटनेची चौकशी करणार असल्याचे सांगितले आहे. अग्निशमन दल आल्याने या चेतकची केवळ वायरिंग आणि हार्नेस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहे. थोडा जरी विलंब झाला असता तरी त्या चेतकची राख झाली असती, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे.
तर चेतक शोरुमचे डीलर अक्षय काळे यांनी ग्राहक रस्त्याकडेला गाडी लावून काहीतरी घ्यायला गेला होता, तेव्हा ही घटना घडल्याचे सांगितले.