फक्त CNG-पेट्रोलच नाही; EV गाड्यांनी गाठला विक्रीचा नवा उच्चांक...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 19:07 IST2025-11-05T19:05:32+5:302025-11-05T19:07:39+5:30
भारताचा EV बाजार नवी विक्रम प्रस्थापित करतोय!

फक्त CNG-पेट्रोलच नाही; EV गाड्यांनी गाठला विक्रीचा नवा उच्चांक...
Electric Vehicle: भारतात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी झपाट्याने वाढत आहे. याचा पुरावा म्हणजे ऑक्टोबर महिन्यात तब्बल 2,34,274 इलेक्ट्रिक वाहनांची देशभरात विक्री झाली. गेल्या वर्षी याच महिन्यातील विक्री 2,19,722 युनिट्स होती. म्हणजेच, या वर्षी विक्रीत 7% वाढ झाली आहे. याचाच अर्थ दररोज सरासरी 7,557 इलेक्ट्रिक वाहनांची विक्री झाली आहे.
सर्व सेगमेंटमध्ये वाढ
या वाढीचे वैशिष्ट्य म्हणजे, दुचाकी, तीनचाकी, प्रवासी आणि व्यावसायिक अशा सर्वच वाहन प्रकारांमध्ये वाढ नोंदवली गेली आहे. सध्या EV बाजारात इलेक्ट्रिक दुचाकींचा सर्वात मोठा, म्हणजेच 61% वाटा आहे. यात वार्षिक 3% वाढ झाली. तर, इलेक्ट्रिक तीनचाकी वाहनांचा 5% वाढीसह 30% हिस्सा आहे. तसेच, सर्वाधिक झेप इलेक्ट्रिक प्रवासी वाहनांमध्ये दिसली. यात तब्बल 57% वाढ झाली, तर इलेक्ट्रिक व्यावसायिक वाहनांच्या विक्रीत 121% ची वाढ नोंदवली गेली आहे.
दुचाकी EV बाजारात ‘बजाज’ अव्वल
ऑक्टोबर 2025 मध्ये इलेक्ट्रिक दुचाकी (स्कूटर, बाईक, मोपेड) सेगमेंटमध्ये 1,43,814 युनिट्सची विक्री झाली, जी आतापर्यंतची सर्वोच्च आकडेवारी आहे. विक्री गेल्या वर्षीच्या 1,40,225 युनिट्सपेक्षा 3% जास्त आहे. या महिन्यात देशातील सहा प्रमुख कंपन्या बजाज ऑटो, टीव्हीएस मोटर, एथर एनर्जी, हीरो मोटोकॉर्प, ओला इलेक्ट्रिक आणि ग्रीव्ह्स इलेक्ट्रिक मोबिलिटी यांनी मिळून एकूण विक्रीच्या 89% बाजारपेठेवर कब्जा केला. उर्वरित 10% विक्री 190 लहान उत्पादकांमध्ये विभागली गेली. महत्त्वाचे म्हणजे, बजाज ऑटोने तब्बल सहा महिन्यांनंतर टीव्हीएस मोटरला मागे टाकत पहिले स्थान पुन्हा मिळवले आहे.
चारचाकी EV बाजारात टाटा आणि महिंद्रा अव्वल
भारतीय इलेक्ट्रिक वाहन बाजारात इलेक्ट्रिक प्रवासी वाहनांचा हिस्सा सध्या 8% आहे. ऑक्टोबर महिन्यात देशात 17,942 इलेक्ट्रिक कार, SUV आणि MPV विकल्या गेल्या. ही विक्री मागील वर्षाच्या तुलनेत 57% जास्त, तर सप्टेंबर 2025 पेक्षा 9% अधिक आहे. या सेगमेंटमध्ये टाटा मोटर्सने 40% मार्केट शेअर कायम ठेवला, तर महिंद्राने आतापर्यंतची सर्वोच्च मासिक विक्री केली. तसेच, JSW MG मोटर इंडियाने 4,497 युनिट्स विकल्या, तर किआ इंडियाने नव्या Carens Clavis EVच्या मागणीमुळे 655 युनिट्स विक्री करुन BYD आणि हुंडई मोटर इंडियालाही मागे टाकले.