Maruti चा ग्राहकांना दणका, कारच्या किमती वाढणार, जाणून घ्या कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2023 13:22 IST2023-11-28T13:20:42+5:302023-11-28T13:22:36+5:30
Maruti Suzuki Price Hike : मारुती सुझुकीने १ जानेवारी २०२४ पासून आपल्या कारच्या किमती वाढवण्याची घोषणा केली आहे.

Maruti चा ग्राहकांना दणका, कारच्या किमती वाढणार, जाणून घ्या कारण
नवी दिल्ली : जर तुम्ही कार घेण्याचा विचार करत असाल तर अधिकचे पैसै मोजण्यासाठी तयार राहा. कारण पुढील वर्षात काही कंपन्यांनी कारच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. महागाईचा फटका आणि कच्चा मालाचे भाव वाढल्यामुळे कंपन्या आपल्या किंमतीत वाढ करत असल्याचे म्हटले जात आहेत. दरम्यान, देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने वर्षअखेर मोठा धक्का दिला आहे. मारुती सुझुकीने १ जानेवारी २०२४ पासून आपल्या कारच्या किमती वाढवण्याची घोषणा केली आहे.
वस्तूंच्या किमती आणि इनपुट खर्चात वाढ झाल्याने कंपनीला हा निर्णय घ्यावा लागला आहे, असे मारुती सुझुकीने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. तसेच, खर्च कमी करण्यासाठी आणि किमतीतील वाढीची भरपाई करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे काही कार खरेदी करताना ग्राहकांना दरवाढीचा भार सहन करावा लागू शकतो, असेही कंपनीने म्हटले आहे. दरम्यान, मारुतीच्या सर्व मॉडेल्सच्या किंमतींमध्ये वाढ होऊ शकते, असे म्हटले जात आहे. मात्र, कंपनीने अद्याप आपल्या मॉडेल्सवर नेमकी किती वाढ होणार, याबाबत काहीच जाहीर केले नाही.
किमतीतील वाढ होणारी सर्व मॉडेल्स वेग-वेगळी असण्याची शक्यता आहे.दरम्यान, मारुती सुझुकीने १ एप्रिल २०२३ मध्ये आपल्या सर्व कारच्या किमती ०.८ टक्क्यांनी वाढवल्या होत्या. दरम्यान, मारुती सुझुकी व्यतिरिक्त, इतर काही ऑटोमोबाईल उत्पादकांनी देखील किमती वाढवण्याची घोषणा केली आहे, नुकतीच जर्मन लक्झरी कार उत्पादक ऑडीने देखील किमती वाढवण्याची घोषणा केली होती. १ जानेवारी २०२४ पासून भारतात सर्व मॉडेलच्या रेंजमधील किमती २ टक्क्यांपर्यंत वाढतील, असे ऑडी इंडियाने सांगितले होते. तसेच, टाटा मोटर्स प्रवाशी आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या किंमतीत जानेवारीत वाढीचा विचार करत आहे.