Maruti Suzuki ची कार घेण्याचा विचार करत असलेल्यांसाठी तगडा झटका, पुन्हा किंमत वाढणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2021 16:08 IST2021-12-02T16:08:16+5:302021-12-02T16:08:54+5:30
भारतातील कार निर्मात्यांनी एक ट्रेंड बनवला आहे, जवळजवळ सर्वच वाहन निर्माते दर वर्षी नवीन वर्षाच्या सुरूवातीला आपल्या गाड्यांच्या किमती वाढवतात. मारुती सुझुकीने यावर्षी तर आपल्या कारच्या किमती ३ वेळा वाढविल्या आहेत.

Maruti Suzuki ची कार घेण्याचा विचार करत असलेल्यांसाठी तगडा झटका, पुन्हा किंमत वाढणार
नवी दिल्ली - 2021 हे वर्ष ग्राहक आणि वाहन निर्माते दोघांसाठीही खूपच वाईट ठरले. या वर्षात कार निर्मात्यांनाही मोठा तोटा सहन करावा लागला. तसेच, खर्चात वाढ झाल्याचे कारण सांगत जवळपास प्रत्येक कंपनीने कारच्या किमती वाढविल्या आहेत. याचा थेट परिणाम ग्राहकांच्या खिशावर होत आहे. आता 2022 हे वर्षही ग्राहकांच्या खिशावर आणखी भार टाकणारेच असल्याचे दिसत आहे. विक्रीच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीने जानेवारी 2022 पासून पुन्हा त्यांच्या वाहनांच्या किमती वाढवण्याची घोषणा केली आहे.
उत्पादन खर्चात वाढ -
नॅशनल स्टॉक ऐक्सचेंजच्या फायलिंगमध्ये मारुती सुझुकीने जानेवारी 2022 पासून कारच्या किंमती वाढविण्याची माहिती दिली आहे. कंपनीने उत्पादन खर्चातील वाढ हे यामागचे कारण सांगितले आहे. तसेच उत्पादन खर्चात झालेल्या वाढीचा काही भाग ग्राहकांवर टाकणे आपली मजबुरी असल्याचेही कंपनीने म्हटले आहे. मात्र, किंमतीत नेमकी किती वाढ केली जाईल, यासंदर्भात अद्याप कंपनीने माहिती दिलेली नाही. तसेच नेमक्या कोण-कोणत्या कारच्या किंमती वाढणार हेही अद्याप समोर आलेले नाही.
मारुती सुझुकीने याच वर्षात तब्बल 3 वेळा वाढवल्या कारच्या किंमती -
भारतातील कार निर्मात्यांनी एक ट्रेंड बनवला आहे, जवळजवळ सर्वच वाहन निर्माते दर वर्षी नवीन वर्षाच्या सुरूवातीला आपल्या गाड्यांच्या किमती वाढवतात. मारुती सुझुकीने यावर्षी तर आपल्या कारच्या किमती ३ वेळा वाढविल्या आहेत. अशात किंमत वाढविण्याचा हा निर्णय आश्चर्यचकित करणारा नाही. मारुती सुझुकीच्या या निर्णयानंतर, आता इतरही कार उत्पादक कंपन्या आपल्या कारच्या किंमती वाढविण्याची घोषणा करू शकतात. यामुळे पुढील वर्षापासून मारुती सुझुकीची कार घेणे आणखी महाग होणार आहे.