Illegal U Turn : पावती फाडण्यासाठी पोहोचले पोलीस, पण रिकाम्या हातानं परतावं लागलं; कारमध्ये डोकावून बघितलं तर...! नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 14:29 IST2025-09-30T14:25:39+5:302025-09-30T14:29:32+5:30
कारण गाडीत ड्रायव्हरच नव्हता... ड्रायव्हर सीट रिकामे होते...!

Illegal U Turn : पावती फाडण्यासाठी पोहोचले पोलीस, पण रिकाम्या हातानं परतावं लागलं; कारमध्ये डोकावून बघितलं तर...! नेमकं काय घडलं?
कॅलिफॉर्नियातील सॅन ब्रुनो येथून एक अनोखी घटना समोर आली आहे. या घटनेने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. डीयूआय चेकपॉइंट मोहीमेदरम्यान पोलिसांनी 'वेमो' (Waymo) या कंपनीच्या ऑटोनॉमस टॅक्सीला अडवले. कारण या टॅक्सीने ‘नो यू-टर्न’ झोनचे उल्लंघन करत यू-टर्न घेतला होता. मात्र, जेव्हा पोलीस त्या टॅक्सीपर्यंत पोहोचले, तेव्हा त्यांनाच धक्काच बसला. कारण गाडीत ड्रायव्हरच नव्हता... ड्रायव्हर सीट रिकामे होते...!
पोलिसांनी ही घटना सोशल मीडियावर शेअर केली -
या घटनेनंतर, सॅन ब्रुनो पोलिसांनी ही घटना सोशल मीडियावर शेअर केली आहे. याच बरोबर त्यांनी लिहिले, “No driver, no hands, no clue!” यामुळे एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. तो म्हणजे, जर गाडीत ड्रायव्हरच नसेल, तर चालान (पावती) कुणाच्या नावाने करायचे? पोलीस म्हणाले, सध्या चालान केवळ मानवी ड्रायव्हरला जारी केले जाऊ शकते. ड्रायव्हरलेस वाहनांसाठी कोणतेही स्पष्ट नियम आपल्याकडे नाहीत. यामुळे पोलिसांनी वेमो कंपनीला या घटनेची माहिती दिली आहे. यावर, कंपनीने प्रतिसाद देत, आपण या प्रकरणाची चौकशी करत आहोत, रस्त्ये नियमांचे पालन करणे, ही आपली जबाबदारी आहे, असे कंपनीने म्हटले आहे.
कॅलिफॉर्निया सरकारने गेल्या वर्षीच बनवलाय कायदा, पण... -
‘द गार्डियन’च्या वृत्तानुसार, कॅलिफॉर्निया सरकारने गेल्या वर्षी एक कायदा मंजूर केला आहे, यामुळे ड्रायव्हरलेस वाहनांनी नियम मोडल्यास पोलिसांना ‘नॉन-कम्प्लायन्स नोटिस’ जारी करण्याचा अधिकार मिळेल. हा कायदा जुलै 2026 पासून लागू होईल. तसेच, कंपन्यांना आपत्कालीन फोन लाइनची व्यवस्था करणे बंधनकारक असेल.