बोल्ड लूकसह स्मार्ट फीचर्स! होन्डाची पहिली इलेक्ट्रिक बाईक लॉन्च, एका चार्जवर १३० किमी धावणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 14:17 IST2025-09-17T14:14:39+5:302025-09-17T14:17:01+5:30
होन्डाने आपली पहिली इलेक्ट्रिक नेकेड मोटरसायकल डब्लूएन ७ युरोपियन बाजारात लॉन्च केली.

बोल्ड लूकसह स्मार्ट फीचर्स! होन्डाची पहिली इलेक्ट्रिक बाईक लॉन्च, एका चार्जवर १३० किमी धावणार
होन्डाने आपली पहिली इलेक्ट्रिक नेकेड मोटरसायकल डब्लूएन ७ युरोपियन बाजारात आणून इलेक्ट्रिक मोटरसायकल क्षेत्रात प्रवेश केला. कंपनीच्या २०४० पर्यंत कार्बन-न्यूट्रल होण्याच्या धोरणाचा हा एक भाग आहे. मिलानमधील EICMA २०२४ मध्ये सादर झालेली डब्लूएन ७ मोटरसायकल होन्डाच्या "फन" कॅटेगरीमधील पहिली फिक्स्ड-बॅटरी इलेक्ट्रिक मोटरसायकल आहे, जी कामगिरी आणि टिकाऊपणा यांचा समतोल राखण्यासाठी डिझाइन केली आहे.
होन्डा इलेक्ट्रिक मोटरसायकलच्या सेगमेंटमध्ये आपले स्थान वाढवण्याचा विचार करत आहे. डब्लूएन ७ च्या माध्यमातून त्यांनी इलेक्ट्रिक 'फन' सेगमेंटमध्ये पाऊल टाकले असून, भविष्यात शहरी वापरासाठी आणि उच्च कामगिरीच्या मोटरसायकलसाठी विविध मॉडेल्स बाजारात आणण्याची त्यांची योजना आहे.
डिझाइन आणि टेक्नोलॉजी:
डब्लूएन ७ मोटरसायकलमध्ये आधुनिक, आकर्षक डिझाइन आहे. यात ५-इंच टीएफटी स्क्रीन असून, Honda RoadSync कनेक्टिव्हिटीमुळे नेव्हिगेशन, कॉल्स आणि नोटिफिकेशन्स सहज उपलब्ध होतात. ही मोटरसायकल शक्तिशाली टॉर्कसह शांत आणि आरामदायी राइडिंगचा अनुभव देते.
बॅटरी आणि चार्जिंग:
एका चार्जवर १३० किमीपर्यंतची रेंज देणारी ही मोटरसायकल CCS2 फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. त्यामुळे ती फक्त ३० मिनिटांत २० टक्के ते ८० टक्केपर्यंत चार्ज होते. घरी चार्ज केल्यास ३ तासांपेक्षा कमी वेळात ती पूर्ण चार्ज होते, असा कंपनीचा दावा आहे.