नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 19:32 IST2025-11-19T19:31:54+5:302025-11-19T19:32:11+5:30
नवीन Honda City चे डिझाईन होंडाच्या अलीकडेच प्रदर्शित झालेल्या '0 Series sedan concept' मधून प्रेरित असणार आहे.

नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
भारतीय बाजारपेठेतील सर्वात प्रतिष्ठित सेडान कारपैकी एक असलेल्या Honda City चे पुढील (सहावे) पिढीचे मॉडेल २०२८ मध्ये मोठे डिझाईन आणि तांत्रिक बदल घेऊन येणार आहे. Hyundai Verna, Skoda Slavia आणि Volkswagen Virtus यांसारख्या कठीण प्रतिस्पर्धकांमध्ये आपले नेतृत्व परत मिळवण्यासाठी कंपनीने हे मोठे पाऊल उचलले आहे.
नवीन Honda City चे डिझाईन होंडाच्या अलीकडेच प्रदर्शित झालेल्या '0 Series sedan concept' मधून प्रेरित असणार आहे. हे डिझाईन अधिक बोल्ड, स्लीक आणि स्पोर्टी असेल. यातील सर्वात मोठे आणि आकर्षक वैशिष्ट्य म्हणजे जुन्या काळात लोकप्रिय असलेल्या 'फ्रंट क्वार्टर ग्लास' चे पुनरागमन होण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, हा डिझाईन घटक प्रतिष्ठित सुपरकार Lamborghini Countach मधून प्रेरित आहे, ज्यामुळे सेडानच्या बाहेरील स्वरूपात लक्षणीय बदल दिसेल आणि ती पूर्वीपेक्षा अधिक ऍथलेटिक दिसेल.
हायब्रीड खर्च कमी करण्यासाठी नवीन प्लॅटफॉर्म
सध्याच्या City e: HEV (हायब्रीड) मॉडेलला उत्कृष्ट मायलेज असूनही, तिची जास्त किंमत ही या कारची कमकुवत बाजु आहे. नवीन सिटी 'PF2 मॉड्युलर आर्किटेक्चर' वर आधारित असेल. हा नवीन प्लॅटफॉर्म विशेषतः हायब्रीडाइजेशनसाठी तयार केला गेला आहे. हा प्लॅटफॉर्म सध्याच्या हायब्रीड बेसपेक्षा सुमारे ९० किलो हलका आहे. पार्ट्सचे लोकल-उत्पादन होऊन बॅटरी पॅकचा खर्चही प्रभावीपणे कमी करता येणार आहे. इंजिन पर्यायांमध्ये सध्याच्या मॉडेलप्रमाणेच १.५-लिटर पेट्रोल आणि १.५-लिटर एटकिंसन-सायकल हायब्रीड (१२६ hp) इंजिन मिळण्याची अपेक्षा आहे.