जीएसटीमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. यामुळे सगळीकडे महागाईने होरपळ सुरु असताना थोडी स्वस्ताई अनुभवता येणार आहे. येत्या २२ सप्टेंबरपासून जीएसटीचे नवीन दर लागू होणार आहेत. ऑटोमोबाईल क्षेत्राला मोठा फायदा होणार आहे. कारण सुमारे १० टक्क्यांनी जीएसटी कमी झाला आहे. पेट्रोल इंजिन १२०० सीसी आणि डिझेल इंजिन १५०० सीसीपेक्षा कमी असलेल्या कारवरील जीएसटी कमी झालेला असतानाच आता धनाढ्यांनाही जीएसटी पावल्याचे समोर येत आहे.
लक्झरी कारवरील जीएसटी हा ४० टक्के ठेवण्यात आला आहे. हा नवीन जीएसटी स्लॅब आहे. यामुळे लक्झरी कार महाग होतील असा अंदाज असताना उलटेच झाले आहे. मर्सिडीज, बीएमडब्ल्यू, जेएलआर आणि ऑडी सारख्या कंपन्यांच्या महागड्या कार स्वस्त झाल्या आहेत.
जीएसटी कौन्सिलने लक्झरी वाहनांवरील उपकर काढून टाकला आहे. सध्याच्या जीएसटीनुसार सर्व प्रकारच्या कारवर २८ टक्के जीएसटी लावला जात होता. तर जीएसटीनंतर १ ते २२ टक्के सेस लावला जात होता. यामुळे लक्झरी कारवर १७ ते २२ टक्के सेस लावला जात होता. हा कर जवळपास कारच्या किंमतीच्या ४५ ते ५० टक्के एवढा होता. आता २२ सप्टेंबरपासून लक्झरी कारवर ४० टक्के कर लागणार आहे. म्हणजेच या कार ५ ते १० टक्क्यांनी स्वस्त होणार आहेत. ही सूट मिळालेल्या कराची रक्कमच एवढी असेल की त्यात तुम्हाला इतर कंपन्यांची छोटी कार देखील घेता येणार आहे.
वाहनांवर नवीन जीएसटी किती...
छोट्या वाहनांवरील कर दरही कमी करण्यात आले आहेत. यामध्ये ३५० सीसीपेक्षा कमी इंजिन क्षमता असलेल्या मोटारसायकल, तीनचाकी वाहने आणि १२००-१५०० सीसीपेक्षा कमी इंजिन क्षमता असलेल्या लहान कारवर १८ टक्के जीएसटी लागणार आहे. बस, ट्रक आणि रुग्णवाहिका यांसारखी मोठी वाहने देखील १८% स्लॅबमध्ये येणार आहेत. याचा फायदा टाटा, आयशर, अशोक लेलँडसारख्या कंपन्यांना होणार आहे. वेगवेगळे कर असलेले ऑटो पार्ट्स आता १८% जीएसटीखाली येणार आहेत.