फोर्डचा मोठा निर्णय! LG सोबतचा ५८,७३० कोटींचा बॅटरी करार रद्द; डोनाल्ड ट्रम्प ठरले व्हिलन...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 10:07 IST2025-12-18T10:06:31+5:302025-12-18T10:07:24+5:30
Ford LG Deal Cancelled: ऑक्टोबर महिन्यात फोर्ड आणि एलजी यांच्यात २०२६ आणि २०२७ पासून युरोपमध्ये ईव्ही बॅटरी पुरवठा करण्यासाठी दोन महत्त्वाचे करार झाले होते.

फोर्डचा मोठा निर्णय! LG सोबतचा ५८,७३० कोटींचा बॅटरी करार रद्द; डोनाल्ड ट्रम्प ठरले व्हिलन...
जागतिक ऑटोमोबाईल क्षेत्रातील दिग्गज कंपनी फोर्ड मोटरने दक्षिण कोरियाच्या 'एलजी एनर्जी सोल्यूशन' सोबतचा तब्बल ६.५० अब्ज डॉलरचा (सुमारे ५८,७३० कोटी रुपये) इलेक्ट्रिक व्हेईकल बॅटरी पुरवठा करार रद्द केला आहे. अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या संभाव्य धोरणांमधील बदल आणि ईव्हीच्या घटत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर फोर्डने हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.
ऑक्टोबर महिन्यात फोर्ड आणि एलजी यांच्यात २०२६ आणि २०२७ पासून युरोपमध्ये ईव्ही बॅटरी पुरवठा करण्यासाठी दोन महत्त्वाचे करार झाले होते. मात्र, फोर्डने आता धोरणात्मक बदल करत काही ईव्ही मॉडेल्सचे उत्पादन थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे दक्षिण कोरियाच्या शेअर बाजारात एलजी एनर्जी सोल्यूशनचे शेअर्स ७ टक्क्यांहून अधिक घसरले आहेत.
ट्रम्प फॅक्टर आणि ईव्ही क्षेत्रातील मंदी
ट्रम्प प्रशासनाच्या नवीन धोरणांमुळे इलेक्ट्रिक वाहनांच्या बाजारपेठेवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. फोर्डने सोमवारी स्पष्ट केले की, कंपनी सुमारे १९.५ अब्ज डॉलरचा 'राइटडाउन' करणार असून अनेक इलेक्ट्रिक मॉडेल्स बंद करणार आहे. केवळ एलजीच नाही, तर गेल्या आठवड्यात 'एसके ऑन' या कंपनीसोबतचा संयुक्त उपक्रमही फोर्डने संपुष्टात आणला आहे.
या निर्णयामुळे ऑटोमोबाईल क्षेत्रात खळबळ उडाली असून, भविष्यात इलेक्ट्रिक वाहनांच्या उत्पादनात मोठी कपात होण्याची चिन्हे दिसत आहेत.