धनत्रयोदशीला एकट्या मारुतीने विकल्या ५०००० गाड्या, बुकिंगचा आकडा बघाल तर...; आजही मुहूर्त सुरूच...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2025 10:45 IST2025-10-19T10:45:39+5:302025-10-19T10:45:57+5:30
Dhanteras Muhurt: जीएसटी कपातीनंतर दुसऱ्यांदा, धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर लोकांनी मोठ्या प्रमाणावर कार खरेदीचा उत्साह दाखवला, ज्यामुळे देशातील प्रमुख ऑटो कंपन्यांच्या विक्रीने विक्रमी आकडेवारी गाठली आहे.

धनत्रयोदशीला एकट्या मारुतीने विकल्या ५०००० गाड्या, बुकिंगचा आकडा बघाल तर...; आजही मुहूर्त सुरूच...
नवी दिल्ली : देशातील कार बाजार धनत्रयोदशी निमित्ताने अक्षरशः बाजार बहरून गेला आहे. जीएसटी कपातीनंतर दुसऱ्यांदा, धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर लोकांनी मोठ्या प्रमाणावर कार खरेदीचा उत्साह दाखवला, ज्यामुळे देशातील प्रमुख ऑटो कंपन्यांच्या विक्रीने विक्रमी आकडेवारी गाठली आहे. देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकी इंडियासाठी यंदाची धनत्रयोदशी अविस्मरणीय ठरली आहे. कंपनीने एकाच दिवसात ५०,००० हून अधिक युनिट्सची विक्री करण्याचा महत्वाकांक्षी टप्पा ओलांडला आहे.
मारुती सुझुकीचे वरिष्ठ कार्यकारी अधिकारी (मार्केटिंग आणि विक्री) पार्थो बनर्जी यांनी दिलेल्या माहितीनुसार, धनत्रयोदशीच्या दिवशी (शनिवार) सायंकाळपर्यंत कंपनीने ३८,५०० युनिट्सची डिलिव्हरी केली होती. रात्रीपर्यंत हा आकडा ४१,००० च्या आसपास पोहोचण्याची शक्यता होती. तसेच, धनत्रयोदशीचा शुभ मुहूर्त रविवार दुपारपर्यंत असल्याने, उर्वरित १०,००० ग्राहकांना रविवारी गाड्यांच्या चाव्या सुपूर्द केल्या जातील.
मागील वर्षाचा विक्रम मोडला: गेल्या वर्षी धनत्रयोदशीच्या दिवशी मारुतीने ४१,५०० युनिट्सची विक्री केली होती. यावर्षी हा आकडा ५०,००० च्या पुढे गेल्याने कंपनीचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा डिलिव्हरी डे ठरला आहे.
सणासुदीच्या बुकिंगमध्ये वाढ: कंपनीला नवरात्रीपासून दररोज सरासरी १४,००० बुकिंग्स मिळत आहेत. १८ सप्टेंबरपासून किमती कमी केल्यानंतर (GST 2.0 मुळे), कंपनीने आतापर्यंत ४.५ लाख बुकिंग्सची नोंद केली आहे, ज्यात लहान कारसाठी ९४,००० हून अधिक बुकिंग्सचा समावेश आहे.
ह्युंदाईनेही केली दमदार कामगिरी
मारुती सुझुकीप्रमाणेच ह्युंदाई मोटर इंडियाने देखील या धनत्रयोदशीला जोरदार विक्रीची नोंद केली आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी तरुण गर्ग यांनी सांगितले की, या धनत्रयोदशीला कंपनीने १४,००० युनिट्सची डिलिव्हरी करण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. ही आकडेवारी कंपनीसाठी एक नवीन विक्रम ठरू शकते. एकंदरीत, या धनत्रयोदशीच्या खरेदीमुळे ऑटो उद्योगात उत्सवाचा उत्साह आणि बाजारात ग्राहकांचा सकारात्मक दृष्टिकोन स्पष्टपणे दिसून येत आहे.