दिल्ली स्फोट: कोणालाही अशीच विकू नका तुमची जुनी कार; खरेदी-विक्री करताना 'हे' तीन नियम पाळाच!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 14:30 IST2025-11-11T14:29:39+5:302025-11-11T14:30:20+5:30
केवळ कागदपत्रे पूर्ण केली नाहीत तर भविष्यात गुन्हेगारी किंवा दहशतवादी कारवायांमध्ये या वाहनांचा वापर झाल्यास कायदेशीर अडचणी येतात. त्यामुळे, स्वतःची आणि देशाची सुरक्षा लक्षात घेऊन जुन्या गाडीचा व्यवहार करताना खालील तीन अत्यावश्यक गोष्टी पाळणे गरजेचे आहे.

दिल्ली स्फोट: कोणालाही अशीच विकू नका तुमची जुनी कार; खरेदी-विक्री करताना 'हे' तीन नियम पाळाच!
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ i20 कारमध्ये झालेल्या स्फोटाच्या घटनेने जुन्या वाहनांच्या खरेदी-विक्रीतील धोके पुन्हा एकदा अधोरेखित केले आहेत. स्फोटासाठी वापरलेली कार फरिदाबादमधून खरेदी केलेली जुनी कार होती, असे तपासात उघड झाल्यानंतर, नागरिकांनी जुनी गाडी घेताना किंवा विकताना अधिक सतर्कता बाळगणे आवश्यक झाले आहे. असाच जुन्या कारचा प्रकार मुंबईत ठाकरे सरकार आल्यावर वाझे या पोलीस अधिकाऱ्याने अंबानींच्या घराबाहेर गाडीत स्फोटके ठेवण्याच्या प्रकरणात समोर आला होता.
यामुळे केवळ कागदपत्रे पूर्ण केली नाहीत तर भविष्यात गुन्हेगारी किंवा दहशतवादी कारवायांमध्ये या वाहनांचा वापर झाल्यास कायदेशीर अडचणी येतात. त्यामुळे, स्वतःची आणि देशाची सुरक्षा लक्षात घेऊन जुन्या गाडीचा व्यवहार करताना खालील तीन अत्यावश्यक गोष्टी पाळणे गरजेचे आहे.
घेताना कागदपत्रे तपासणी
जुनी कार खरेदी करताना दस्तऐवज तपासणे हे सर्वात महत्त्वाचे आहे. कार चोरीची तर नाहीय ना, गाडीचा चेसिस नंबर, इंजिन नंबर याची खात्री करा.
RC ची खात्री: कारच्या नोंदणी प्रमाणपत्राची बारकाईने तपासणी करा आणि विक्रेता हाच गाडीचा खरा मालक आहे का, याची खात्री करा.
चेसिस आणि इंजिन नंबर: RC वर असलेला चेसिस नंबर आणि इंजिन नंबर कारवरील क्रमांकाशी जुळतो का, हे पडताळा.
अन्य प्रमाणपत्रे: PUC प्रमाणपत्र आणि विमा पॉलिसी वैध असल्याची तपासणी करा.
कर्जमुक्त प्रमाणपत्र (NOC): जर गाडी कर्जावर घेतली असेल, तर कर्ज पूर्ण फेडल्याचे बँक किंवा फायनान्स कंपनीचे ना हरकत प्रमाणपत्र (NOC) तपासणे अनिवार्य आहे.
जुने वाहन देताना काय?....
ताबडतोब RTO मध्ये अर्ज: गाडी विकल्यानंतर, खरेदीदाराने कोणत्याही विलंबाशिवाय प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) मध्ये मालकी हक्क त्वरित आपल्या नावावर हस्तांतरित करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी, याची खात्री विक्रेत्याने करावी.
कायदेशीर जबाबदारी: जोपर्यंत हे हस्तांतरण पूर्ण होत नाही, तोपर्यंत कायद्याच्या दृष्टीने वाहनाची जबाबदारी माजी मालकावरच राहते. या काळात जर वाहनाचा वापर कोणत्याही गुन्ह्यात (उदा. दिल्ली स्फोट) किंवा अपघातात झाला, तर विक्रेत्यालाही पोलीस चौकशीला सामोरे जावे लागू शकते.
पुरावा ठेवा: विक्री होताच RTO मध्ये हस्तांतरणासाठी अर्ज केल्याचा पुरावा आपल्याजवळ सुरक्षित ठेवा आणि त्याचा पाठपुरावा करा. तसेच ज्याला विकली आहे त्याची काही डॉक्युमेंट जसे की ड्रायव्हिंग लायसन, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र आदी त्या व्यक्तीच्या फोटोसह पुरावे गाडी नावावर हस्तांतरीत होत नाही तोवर जवळ ठेवा.