आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 16:45 IST2025-06-18T16:45:05+5:302025-06-18T16:45:14+5:30
एका महिलेचा एअर बॅग फुटल्याने मृत्यू झाल्याने कंपनीने ही वॉर्निंग जारी केली आहे. भारतात अद्याप अशाप्रकारची कोणतीही सूचना किंवा अलर्ट देण्यात आलेला नाहीय.

आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
काही वर्षांपूर्वी भारतात आलेल्या युरोपची सिट्रोएन कंपनीने युरोपमध्ये सी ३ ही कार चालविण्याचे थांबविण्यास सांगत आहे. सिट्रोएनने सी ३ आणि डीएस३ या कार तातडीने वापरण्याचे थांबवण्यास सांगितले आहे. एका महिलेचा एअर बॅग फुटल्याने मृत्यू झाल्याने कंपनीने ही वॉर्निंग जारी केली आहे. भारतात अद्याप अशाप्रकारची कोणतीही सूचना किंवा अलर्ट देण्यात आलेला नाहीय.
Citroen (सिट्रोएन) ही फियाटची ग्रुप कंपनी आहे. या कंपनीसह बहुतांश कंपन्यांच्या कारमध्ये टकाटा कंपनीच्या एअरबॅग बसविलेल्या असतात. त्या अपघात झाला की उघडतात आणि आतमध्ये बसलेल्या प्रवाशांना पुढे आदळण्यापासून वाचवितात. परंतू, या एअरबॅग आतमध्ये मिलिसेकंदाच्या गतीने हवा जात असताना फुटत आहेत, यामुळे एअरबॅगचा स्फोट होऊन लोकांचा मृत्यू होत आहे. ही समस्या जुनीच आहे. परंतू, फ्रान्स सरकारने सिट्रोएनला यावर तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.
युरोपमधील सुमारे ४.४१ लाख C3 आणि DS3 कारवर परिणाम झाला आहे. इतकेच नाही तर गेल्या वर्षीपासून कंपनी लाखो कार रिकॉल करत आहे. एका फ्रेंच वृत्तसंस्थेने वृत्त दिले आहे की कंपनी आता अधिकृतपणे प्रभावित वाहनांसाठी रिकॉल सुरू करणार आहे.
टकाटा ठरतेय काळ...
टकाटा एअरबॅग ही एकीकडे जीव वाचविणारी देखील आहे परंतू जीव घेणारी देखील आहे. टकाटा एअरबॅगमुळे आतापर्यंत फ्रान्समध्ये १३ जणांना जीव गमवावा लागला आहे. २०१४ पासून ही समस्या येत आहे. या समस्येतून एकही कार कंपनी सुटलेली नाही. या कंपन्यांना वेळोवेळी कार माघारी बोलावून सदोष एअरबॅग बदलून द्याव्या लागत आहेत. परंतू, सिट्रॉएनने रिकॉल न करता थेट वापरूच नका असे सांगितले आहे. म्हणजे या सदोष एअरबॅग वेगाने बदलता येतील. आतापर्यंत सिट्रोएन इंडियाने भारतात विकल्या जाणाऱ्या C3 वाहनांसाठी असा कोणताही स्टॉप ड्राइव्ह अलर्ट किंवा रिकॉल नोटीस जारी केलेला नाही.