नवीन वर्षात वाहन खरेदी महागणार; 'या' कंपन्यांनी केली घोषणा, जाणून घ्या कारण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 12:49 IST2025-12-24T12:49:09+5:302025-12-24T12:49:17+5:30
तुम्ही नवीन कार किंवा दुचाकी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.

नवीन वर्षात वाहन खरेदी महागणार; 'या' कंपन्यांनी केली घोषणा, जाणून घ्या कारण...
Car-Bike Buying Guide: तुम्ही नवीन कार किंवा दुचाकी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. नव्या वर्षाच्या सुरुवातीपासून, म्हणजेच जानेवारी 2026 पासून भारतात कार, दुचाकी तसेच इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. अनेक नामांकित वाहन उत्पादक कंपन्यांनी याबाबत संकेत दिले असून, वाढत्या उत्पादन खर्चामुळे दरवाढ अपरिहार्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
वाढत्या खर्चामुळे दरवाढीचा निर्णय
ऑटोमोबाईल कंपन्यांच्या मते, सध्या उत्पादनाशी संबंधित खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे नफा टिकवून ठेवण्यासाठी वाहनांच्या किमती वाढवणे आवश्यक झाले आहे. याचा थेट परिणाम वाहन खरेदीची योजना आखणाऱ्या ग्राहकांवर होणार आहे.
कच्च्या मालाच्या किमती ठरल्या मुख्य कारण
वाहन निर्मितीसाठी लागणाऱ्या तांबा, अॅल्युमिनियम आणि इतर विशेष धातूंच्या किमती अलीकडच्या काळात झपाट्याने वाढल्या आहेत. या धातूंचा वापर इंजिन, इलेक्ट्रॉनिक प्रणाली आणि इतर महत्त्वाच्या भागांसाठी केला जातो. यातील बहुतांश धातू परदेशातून आयात केल्या जात असल्याने डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत झाल्यास आयात खर्च आणखी वाढतो. अलीकडे रुपयाच्या घसरणीमुळे कंपन्यांच्या एकूण खर्चात मोठी वाढ झाली आहे.
किमती किती वाढू शकतात?
बाजारातील तज्ज्ञांच्या मते, वाहन कंपन्या साधारणपणे वर्षाच्या सुरुवातीलाच किमतींमध्ये बदल करतात. यंदा कार आणि दुचाकींच्या किमतींमध्ये सुमारे 2 ते 3 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र, बाजारात अनेक ब्रँड्स उपलब्ध असल्याने मोठ्या प्रमाणात दरवाढ करणे कंपन्यांसाठी सोपे नाही. तरीही मजबूत मागणी आणि चांगल्या बुकिंगमुळे ग्राहक वाहन खरेदी सुरूच ठेवतील, असा कंपन्यांचा विश्वास आहे.
कोणत्या कंपन्यांनी दरवाढीची घोषणा केली?
JSW MG Motor India - सर्व मॉडेल्सच्या किमती सुमारे 2 टक्क्यांनी वाढणार
Mercedes-Benz India - सर्व लक्झरी मॉडेल्सच्या किमती वाढवणार
BMW Motorrad India - बाइक्सच्या किमतींमध्ये लक्षणीय वाढ
Ather Energy - सर्व इलेक्ट्रिक स्कूटर्स महाग होणार
दुचाकी आणि इलेक्ट्रिक वाहनेही महागणार
फक्त कारच नव्हे, तर दुचाकी आणि इलेक्ट्रिक स्कूटर्सच्या किमतीही वाढण्याची शक्यता आहे. इलेक्ट्रॉनिक पार्ट्सच्या वाढत्या किमती आणि विदेशी चलनातील चढ-उतार याचा थेट परिणाम वाहनांच्या दरांवर होत आहे. येत्या काळात आणखी कंपन्या दरवाढीचा निर्णय जाहीर करू शकतात.
ग्राहकांसाठी काय सल्ला?
जर तुम्ही लवकरच वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर किंमत वाढ लागू होण्यापूर्वी निर्णय घेणे फायदेशीर ठरू शकते, असे ऑटो क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.