वाढते प्रदूषण आणि पेट्रोल-डिझेलच्या गगनाला भिडलेल्या किमतींमुळे सध्या भारतीय रस्त्यांवर इलेक्ट्रिक वाहनांचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. सरकारही ई-वाहनांना प्रोत्साहन देत असल्याने अनेकांनी आपला मोर्चा ई-कार आणि ई-स्कूटरकडे वळवला आहे. मात्र, ईव्ही खरेदी करणे जितके सोपे आहे, तितकीच मोठी जबाबदारी ती चार्ज करण्याची आहे. विशेषतः घरी चार्जिंग करताना होणारी छोटीशी निष्काळजी मोठी दुर्घटना घडवू शकते. त्यामुळेच ईव्ही चार्जिंगबाबत योग्य माहिती आणि सतर्कता असणे काळाची गरज बनली आहे.
घरच्या चार्जिंगसाठी डेडिकेटेड फ्युज बोर्ड हवाच!
बहुतेक ईव्ही मालक आपली गाडी रात्रभर चार्जिंगला लावतात. मात्र, घरातील सामान्य सॉकेटमध्ये प्लग लावणे पुरेसे नाही. इलेक्ट्रिक कार चार्ज करण्यासाठी घरात स्वतंत्र फ्युज बोर्ड बसवणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे चार्जिंग सिस्टीम घराच्या इतर इलेक्ट्रिक सर्किटपासून वेगळी राहते, परिणामी ओव्हरलोड किंवा शॉर्ट सर्किटचा धोका टळतो. हे काम नेहमी कंपनीने सुचवलेल्या प्रोफेशनल इलेक्ट्रिशियनकडूनच करून घ्यावे.
प्रोफेशनल चार्जिंग स्टेशनचा वापर करा
साध्या सॉकेटपेक्षा ७ किलोवॅट किंवा २२ किलोवॅटचे प्रोफेशनल चार्जिंग स्टेशन अधिक सुरक्षित असतात. यामध्ये अनेक अंगभूत सेफ्टी फीचर्स असतात, जे अपघाताची शक्यता कमी करतात. तसेच, चार्जिंग केबल, प्लग आणि पॉईंटची वेळोवेळी तपासणी करणे गरजेचे आहे. जर केबलला कुठे कट किंवा घासल्याचे निशाण दिसले, तर स्वतः दुरुस्त करण्याऐवजी तज्ज्ञांच्या मदतीने ती त्वरित बदला.
चार्जिंग एरिया असावा एकदम 'क्लीन'
तुमची ईव्ही जिथे उभी राहते, त्या जागेची निवड विचारपूर्वक करा. चार्जिंग पॉईंटच्या आसपास पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडर, पेंट, थिनर किंवा कोणत्याही ज्वलनशील वस्तू अजिबात नसाव्यात. चार्जिंगची जागा कोरडी आणि स्वच्छ असावी. पाणी किंवा घाण असल्यास करंट लागण्याचा किंवा शॉर्ट सर्किटचा धोका वाढतो.
ओव्हरचार्जिंग टाळा, बॅटरीचे आयुष्य वाढवा
आजकालच्या गाड्यांमध्ये 'कट-ऑफ' सिस्टीम असली, तरी गाडी १०० टक्के चार्ज झाल्यावर प्लग काढून घेणे कधीही उत्तम. तज्ज्ञांच्या मते, बॅटरी ८० ते ९० टक्क्यांपर्यंत चार्ज करणे बॅटरीच्या आरोग्यासाठी चांगले असते. रात्रभर विनाकारण प्लग लावून ठेवल्याने बॅटरीवर दबाव येतो आणि गरम होऊन आग लागण्याचा धोका संभवतो.
व्होल्टेज फ्लक्चुएशनपासून सावधान!
अनेक ठिकाणी विजेचा दाब कमी-जास्त होत असतो. अशा वेळी बॅटरी आणि चार्जिंग सिस्टीम जळण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी घरात सर्ज प्रोटेक्टर बसवणे हा एक उत्तम पर्याय आहे. कंपनीने दिलेल्या गाईडलाईन्सचे तंतोतंत पालन केल्यास तुमची ईव्ही आणि तुमचे घर दोन्ही सुरक्षित राहू शकतात.
Web Summary : Electric vehicle popularity is rising, but safe charging is crucial. Use dedicated circuits, professional stations, and clean areas. Avoid overcharging and voltage fluctuations to protect your EV and home from potential hazards.
Web Summary : इलेक्ट्रिक वाहनों की लोकप्रियता बढ़ रही है, लेकिन सुरक्षित चार्जिंग महत्वपूर्ण है। समर्पित सर्किट, पेशेवर स्टेशन और स्वच्छ क्षेत्रों का उपयोग करें। अपने ईवी और घर को संभावित खतरों से बचाने के लिए ओवरचार्जिंग और वोल्टेज के उतार-चढ़ाव से बचें।