मोठी उलथापालथ! ओला इलेक्ट्रीक रसातळाला पोहोचली; नोव्हेंबरच्या रेसमध्ये बाहेर फेकली गेली
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 17:00 IST2025-12-03T16:59:55+5:302025-12-03T17:00:52+5:30
सर्वाधिक विक्री करून अनेक महिने पहिल्या क्रमांकावर राहिलेली Ola Electric या महिन्यात पाचव्या क्रमांकावर घसरली आहे, तर TVS Motors ने पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावले आहे.

मोठी उलथापालथ! ओला इलेक्ट्रीक रसातळाला पोहोचली; नोव्हेंबरच्या रेसमध्ये बाहेर फेकली गेली
भारतातील इलेक्ट्रिक दुचाकी बाजारपेठेत नोव्हेंबर २०२५ मध्ये मोठी उलथापालथ पाहायला मिळाली आहे. दसरा-दिवाळीसारखा सणांचा काळ संपल्यानंतर विक्रीत अपेक्षित घट झाली असली तरी, नोव्हेंबर महिन्यात बाजारपेठेतील समीकरणे बदलली आहेत. सर्वाधिक विक्री करून अनेक महिने पहिल्या क्रमांकावर राहिलेली Ola Electric या महिन्यात पाचव्या क्रमांकावर घसरली आहे, तर TVS Motors ने पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावले आहे.
वाहन डॅशबोर्डवरील आकडेवारीनुसार (नोव्हेंबर २०२५), TVS Motors ने सर्वाधिक ३०,३०९ युनिट्सची विक्री करून बाजारात आपले वर्चस्व पुन्हा प्रस्थापित केले आहे. ऑक्टोबरच्या तुलनेत टीव्हीएसने विक्रीत २.१% ची किरकोळ वाढ नोंदवली. iQube सिरीजची सातत्यपूर्ण मागणी टीव्हीएसच्या यशाचे मुख्य कारण आहे.
Ola Electric ची मोठी घसरण
या महिन्यात सर्वाधिक चर्चेत राहिली ती Ola Electric ची कामगिरी. ऑक्टोबरमध्ये १६,०४९ युनिट्सची विक्री करणाऱ्या ओलाने नोव्हेंबरमध्ये केवळ ८,४०० युनिट्सची विक्री केली, जी महिन्याच्या तुलनेत ४७.६% ची मोठी घसरण आहे. ही विक्री २०२५ मधील ओलाची सर्वात कमी मासिक विक्रीपैकी एक आहे. कंपनीच्या नेटवर्क पुनर्रचना आणि सर्व्हिस मॉडेलमधील बदलाचा परिणाम या विक्रीवर झाल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
ऑक्टोबरच्या मजबूत कामगिरीनंतर बजाज चेतकच्या विक्रीत १८.७% घट झाली, तरीही २५,५२७ युनिट्ससह ते दुसऱ्या स्थानावर कायम राहिली आहे. एथरची विक्री घटून २०,३२४ युनिट्सवर आली, परंतु त्यांनी १८% हून अधिक बाजार हिस्सा कायम ठेवला. तर हिरो मोटोकॉर्पच्या विडा स्कूटरची विक्री १२,१९९ युनिट्सवर आली आहे. ग्रीव्हजने 5763 स्कूटर विकल्या आहेत. तर बीगॉसने 2566 स्कूटर विकल्या आहेत. या महिन्यात केवळ दोनच कंपन्यांनी जादा विक्री केली आहे.
फक्त दोन कंपन्यांची वाढ
नोव्हेंबरमध्ये विक्रीत वाढ नोंदवणाऱ्या टॉप-१० मधील फक्त दोन कंपन्या होत्या:
River Mobility: विक्रीत १०.०% वाढ (१,७९८ युनिट्स).
Kinetic Green: विक्रीत १२.५% वाढ (१,३४० युनिट्स).