फास्टॅग वापरकर्त्यांना नवीन वर्षात मोठे गिफ्ट! १ फेब्रुवारीपासून 'KYV' ची कटकट संपणार; NHAI चा मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 08:13 IST2026-01-02T08:12:45+5:302026-01-02T08:13:46+5:30
NHAI FASTag New Rules: १ फेब्रुवारी २०२६ पासून नवीन फास्टॅगसाठी KYV अनिवार्य नसेल. जुन्या युझर्सनाही मोठा दिलासा. वाचा सविस्तर माहिती.

फास्टॅग वापरकर्त्यांना नवीन वर्षात मोठे गिफ्ट! १ फेब्रुवारीपासून 'KYV' ची कटकट संपणार; NHAI चा मोठा निर्णय
नवी दिल्ली: राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने देशभरातील लाखो वाहनधारकांना मोठा दिलासा दिला आहे. नवीन फास्टॅग घेण्यासाठी आता अनिवार्य असलेली 'KYV' (Know Your Vehicle) प्रक्रिया १ फेब्रुवारी २०२६ पासून बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे नवीन फास्टॅग घेताना किंवा सक्रिय करताना वाहनधारकांना होणारा मनस्ताप आता थांबणार आहे.
नेमका बदल काय?
यापूर्वी, कार, जीप किंवा व्हॅनसाठी नवीन फास्टॅग घेताना 'नो युअर व्हेईकल' (KYV) ही पडताळणी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक होते. कागदपत्रे वैध असूनही अनेकदा या प्रक्रियेमुळे टॅग सक्रिय होण्यास उशीर व्हायचा. आता NHAI ने ही प्रक्रियाच रद्द केली आहे.
जुन्या फास्टॅग धारकांचे काय?
ज्यांच्याकडे आधीच फास्टॅग आहे, त्यांनाही आता नियमितपणे KYV करण्याची गरज उरणार नाही. फक्त खालील काही विशेष प्रकरणांतच याची गरज भासू शकते:
फास्टॅगचा चुकीचा वापर होत असल्याची तक्रार आल्यास.
टॅग चिकटवलेला नसल्यास किंवा तांत्रिक बिघाड असल्यास.
चुकीच्या पद्धतीने टॅग जारी केला गेला असल्यास.
आता बँक कशी करणार व्हेरिफिकेशन?
प्रक्रिया सोपी केली असली तरी सुरक्षेसाठी NHAI ने बँकांसाठी नियम कडक केले आहेत. आता फास्टॅग सक्रिय करण्यापूर्वी बँकांना 'वाहन' (VAHAN) डेटाबेसवरून वाहनाची माहिती पडताळणे अनिवार्य असेल. जर माहिती डेटाबेसमध्ये नसेल, तरच आरसी (RC) बुकद्वारे पडताळणी केली जाईल.