मला पुरस्कार द्या...! पठ्ठ्याने फास्टॅग पास आल्यापासून २५ दिवसांत ११,००० किमी थार चालविली, वाचले एवढे रुपये...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 09:52 IST2025-10-03T09:49:27+5:302025-10-03T09:52:27+5:30
Annual FASTag Benefits: एका तरुणाने वार्षिक फास्टॅगच्या मदतीने 25 दिवसांत 11,000 किमी प्रवास केला आणि 17,000 रुपयांची टोल बचत केली. नितीन गडकरी आणि NHAI च्या या योजनेबद्दल अधिक जाणून घ्या.

मला पुरस्कार द्या...! पठ्ठ्याने फास्टॅग पास आल्यापासून २५ दिवसांत ११,००० किमी थार चालविली, वाचले एवढे रुपये...
नोएडा: भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) ने काही महिन्यांपूर्वी वार्षिक फास्टॅग योजना (Annual FASTag Plan) सुरु केला आहे. या योजनेमुळे वाहनचालकांना टोल नाक्यांवर खूप पैसे वाचणार आहेत. नोएडातील एका तरुणाने या योजनेचा पुरेपूर फायदा घेतला असून, त्याने आपल्या 25 दिवसांच्या प्रवासात तब्बल 17 हजार रुपयांची बचत केली आहे. पंकज सोनी असे या तरुणाचे नाव असून, त्याने आपल्या इंस्टाग्राम पेज 'मेकॅनिकल जुगाडू' (Mechanical Jugadu) वर एक व्हिडिओ शेअर करून आपला अनुभव सांगितला आहे.
काय आहे वार्षिक फास्टॅग योजना?
NHAI ने सुरु केलेल्या या योजनेअंतर्गत, वाहनचालकांना 3000 रुपयांमध्ये वार्षिक पास मिळतो. या पासच्या माध्यमातून ते वर्षभरात 200 वेळा टोल फ्री प्रवास करू शकतात. याचाच अर्थ, एकदा 3000 रुपये भरल्यानंतर वर्षभर टोलची चिंता करण्याची गरज नाही. १५ ऑगस्ट २०२५ पासून ही योजना लागू झाली आहे.
पंकजचा 11,000 किलोमीटरचा प्रवास
पंकज सोनीने आपल्या थार गाडीने एकट्याने 11,000 किलोमीटरचा प्रवास केला. या प्रवासात त्याने 13 राज्यांना भेट दिली आणि 12 ज्योतिर्लिंगांचे (Jyotirlinga) आणि चार धामांचे (Char Dham) दर्शन घेतले. प्रवासाला निघण्यापूर्वी त्याच्या फास्टॅगमध्ये 199 टोल ट्रिप शिल्लक होत्या आणि प्रवास संपवून परत आल्यावर 80 ट्रिप शिल्लक राहिल्या होत्या. म्हणजेच, त्याने 119 टोल नाके पार केले. यावरून त्याने आता आपल्याला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यां नी पुरस्कार द्यावा, अशी मागणी केली आहे.
17 हजारांची बचत
पंकजने सांगितले की, या प्रवासासाठी त्याला साधारणतः 15,000 ते 17,000 रुपये टोल भरावा लागला असता. मात्र, वार्षिक फास्टॅग योजनव्यतिरिक्त त्याला फक्त 2439 रुपये जादा लागले. हे अतिरिक्त पैसे त्याला आग्रा-लखनऊ एक्सप्रेस वे (Agra-Lucknow Expressway) आणि तामिळनाडूच्या काही भागात द्यावे लागले, कारण या ठिकाणी वार्षिक पास लागू होत नाही.
पंकजच्या या व्हिडिओमुळे वार्षिक फास्टॅग योजनेची उपयुक्तता पुन्हा एकदा समोर आली आहे. जे लोक सतत प्रवास करत असतात, त्यांच्यासाठी ही योजना अत्यंत फायदेशीर ठरू शकते.