Who has power over Gulamandi? Shiv Sena or BJP ... | गुलमंडीवर सत्ता कुणाची? शिवसेनेची की भाजपची...
गुलमंडीवर सत्ता कुणाची? शिवसेनेची की भाजपची...

ठळक मुद्देसध्या वॉर्ड भाजप समर्थकांकडे सेना बालेकिल्ला परत मिळविणार?

- मुजीब देवणीकर 

औरंगाबाद : महापालिका निवडणुकीत यंदा शिवसेनेचा गड असलेल्या गुलमंडी वॉर्डावर अधिराज्य कोण गाजवणार? असा प्रश्न आतापासूनच उपस्थित होत आहे. सध्या वॉर्ड भाजप समर्थक तथा अपक्ष नगरसेवक राजू तनवाणी यांच्या ताब्यात आहे. शिवसेना आपला गड भाजपकडून हिसकावून घेण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करणार आहे. वॉर्ड यंदा ओबीसी किंवा ओबीसी महिला तसेच अनुसूचित जातीसाठी राखीव होईल, असाही अंदाज व्यक्त करण्यात येतो. आरक्षणाचे समीकरण निश्चित झाल्यावर सेना-भाजप नेते आपले राजकीय पत्ते ओपन करणार आहेत.

१९८८ पासून २०१० पर्यंत गुलमंडी वॉर्डावर शिवसेनेने एकहाती अधिराज्य गाजविले. २०१५ पूर्वी भाजपमध्ये गेलेले माजी आ. किशनचंद तनवाणी यांचे बंधू राजू तनवाणी यांनी या वॉर्डातून अपक्ष निवडणूक लढवून विजयश्री खेचून आणली. पक्ष कोणताही असला तरी गुलमंडी आमचीच असा संदेश तनवाणी कुटुंबियांनी दिला होता. राजू तनवाणी यांना २१५६ तर अपक्ष उमेदवार पप्पू व्यास यांना १९९८ मते पडली होती. अवघ्या १५८ मतांनी तनवाणी विजयी झाले होते.  शिवसेना या निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकावर फेकल्या गेली. माजी खा. चंद्रकांत खैरे यांनी आपला पुतण्या सचिन खैरे यांना उमेदवारी दिली होती. सचिन यांना १४७७ मते मिळाली होती. बेगमपुरा वॉर्डाच्या पोटनिवडणुकीत खैरे यांनी पुतण्या सचिन यांचे पुनर्वसन केले होते.

एप्रिल २०२० मध्ये होणाऱ्या मनपा निवडणुकीत वॉर्ड कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षित होईल यावर पुढील राजकीय गणित अवलंबून असणार आहे. तनवाणी कुटुंबातून कोणीही निवडणूक लढविण्याच्या मन:स्थितीत सध्या नाही. भाजप येथून प्रबळ दावेदार देणार हेसुद्धा तितकेच खरे आहे. मागील निवडणुकीत अवघ्या १५८ मतांनी पराभूत झालेल्या पप्पू व्यास यांच्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. गुलमंडी वॉर्डात अधिकृत कमळ कसा फुलेल यादृष्टीने भाजप मैदानात उतरणार आहे. 

शिवसेना आपला गड मिळविण्यासाठी कंबर कसून मैदानात उतरणार आहे. चंद्रकांत खैरे यांच्या कुटुंबातून ऋषी खैरे यांना ज्योतीनगर वॉर्ड अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्यास तेथून निवडणूक लढविण्याचा एक विचार सुरू आहे. आ. प्रदीप जैस्वाल आपले चिरंजीव ऋषी जैस्वाल यांना मनपा निवडणूक रिंगणात उतरविणार हे निश्चित आहे. ऋषी जैस्वाल गुलमंडी वॉर्ड ओबीसीसाठी राखीव झाल्यास तेथून सेनेचे तिकीट मिळविण्यासाठी प्रयत्न करतील. समर्थनगर वॉर्ड ओबीसी झाल्यास ऋषी तेथून निवडणूक लढवतील. गुलमंडी वॉर्डातून मिथुन व्यास यांच्यावरही डाव खेळण्याचा प्रयत्न शिवसेना करू शकते. व्यास कुटुंबियांमधील कलहाचा फायदा सेना घेण्याचा प्रयत्न करणार आहे.

गुलमंडीवरील आजपर्यंतचे नगरसेवक
१९८८ - चंद्रकांत खैरे (शिवसेना)
१९९५ - प्रदीप जैस्वाल (शिवसेना)
२००० - किशनचंद तनवाणी (शिवसेना)
२००५ - किशनचंद तनवाणी (शिवसेना)
२०१० - प्रीती तोतला (शिवसेना)
२०१५ - राजू तनवाणी (अपक्ष-भाजप समर्थन)

Web Title: Who has power over Gulamandi? Shiv Sena or BJP ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.