Where did my 'wise' Maharashtra go ? Madhu Mangesh Karnik rises question | कुठे गेला माझा तो ‘शहाणा’ महाराष्ट्र ? मधु मंगेश कर्णिक यांचा खडा सवाल 
कुठे गेला माझा तो ‘शहाणा’ महाराष्ट्र ? मधु मंगेश कर्णिक यांचा खडा सवाल 

ठळक मुद्दे महाराष्ट्र ‘वेडा’ होता कामा नये, अशी आग्रही भूमिका कर्णिक यांनी मांडली.नरेंद्र चपळगावकर यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान 

औरंगाबाद : शंभर वर्षांची वैचारिक व शहाणपणाची परंपरा असलेला हा महाराष्ट्र.... मराठवाड्याने तर रत्नासारखी माणसे दिली.अनेक साधू-संत दिले; पण आज हा शहाणपणा व विवेकवाद उरलाय का? कु ठे गेला तो माझा ‘शहाणा’ महाराष्ट्र ? असा खडा सवाल आज येथे प्रख्यात साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी विचारला. व त्याचवेळी महाराष्ट्र ‘वेडा’ होता कामा नये, अशी आग्रही भूमिका मांडली. मसापचा जीवन गौरव पुरस्कार न्या. नरेंद्र चपळगावकर यांना देताना ते बोलत होते. मसापच्या डॉ. ना. गो. नांदापूरकर सभागृहात मसापचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील, मधुकरअण्णा मुळे आदींच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न झाला.

नरेंद्र चपळगावकर विचारांची दिशा देतात. न्यायबुद्धी तर त्यांच्याकडे आहेच. त्यांचं लेखन शहाणपण देऊन जाते. गेल्या १०-१५ वर्षांपासून ते जे  लिहिताहेत ते फार मोलाचं आहे. हे समाजाचं मोठं धन होय. मोठं वैभव होय,या पुरस्कारामागे मसापचं निर्मळ मन त्यांच्यामागे आहे. रक्कम किती, शाली किती याला महत्त्व नाही, असे गौरवोद्गार कर्णिक यांनी काढले. कर्णिक म्हणाले, आज पाच-सहा रुपये देऊन विकत घेतलेल्या वर्तमानपत्रात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार अशा बातम्या वाचल्यानंतर मन विषण्ण होतं. मी कुठल्या पक्षाचा नाही. एक संवेदनशील नागरिक आहे; पण राजकारणानं विवेकवाद संपवलाय. रस्त्यानं चालणाऱ्या दाभोलकरांना सहज मारलं जातं. महाराष्ट्राची संवेदनशीलता संपलीय का? 

नरेंद्र चपळगावकर 
मातृसंस्था मसापतर्फे हा सत्कार होतोय. मसापच्या उभारणीत राबलेल्या, निरपेक्षपणे कष्ट घेतलेल्या त्या साऱ्यांचा हा सत्कार आहे, असे मी मानतो. मसापच्या शाखांची स्थापना करणाऱ्या शिक्षकांचं आज स्मरण होतंय. मराठीच्या प्रसारासाठी मायबोली पथकाची स्थापना करणाऱ्या तुळजापूरच्या क.भ. प्रयागसारख्या कार्यकर्त्याच्या निरलस प्रेमातून साहित्य परिषद उभी राहत असते, असे सांगत नरेंद्र चपळगावकर यांनी सत्काराला उत्तर दिले. न.शे.पोहनेरकर, तु.शं. कुलकर्णी, सुधीर रसाळ, अनंत भालेराव, रा.रं. बोराडे, बाबा भांड,  कौतिकराव ठाले आदींचा गौरवपूर्ण उल्लेख त्यांनी केला. मसापच्या कामाचा, मैत्रीचा व प्रेमाचा आनंद दिला, असे चपळगावकर यांनी कृतज्ञतेने नमूद केले. 

ज्येष्ठ समीक्षक व विचारवंत प्रा. डॉ. ऋषिकेश काबंळे यांनी नरेंद्र चपळगावकर: व्यक्ती, लेखन व कर्तृत्व यावर सविस्तर भाष्य केले. चपळगावकर यांनी आपले १८ ग्रंथ कुणाला अर्पण केले, याकडे त्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले. ग्रंथ कुणाला अर्पण केले, हे फार महत्त्वाचे असते असे ते म्हणाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे दलितोद्धारक या कोंदणात दलितही ठेवू इच्छितात आणि दलितेतरही. ही भूमिका चपळगावकर यांना मान्य नाही. चपळगावकर यांचं ललित लेखनही विचारलोलुप दृष्टी देणारे आहे, असे डॉ. कांबळे म्हणाले. प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांनी प्रास्ताविक केले, तर रंिसका देशमुख यांनी मानपत्राचे वाचन केले. डॉ. कैलास इंगळे यांनी सूत्रसंचालन केले, तर के. एस. अतकरे यांनी आभार मानले. कार्यक्रमास कविवर्य फ. मुं. शिंदे, प्राचार्य प्रतापराव बोराडे, रा. रं. बोराडे, डॉ. सुधीर रसाळ, बाबा भांड यांच्यासह मोठ्या संख्येने रसिक-श्रोत्यांची उपस्थिती होती.


Web Title: Where did my 'wise' Maharashtra go ? Madhu Mangesh Karnik rises question
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.