Two close friends killed in a horrific accident | भीषण अपघातात दोन जिवलग मित्र ठार

भीषण अपघातात दोन जिवलग मित्र ठार

औरंगाबाद: पैठण तालुक्यातील तोंडोळी येथून औरंगाबादला येणाऱ्या दुचाकीस्वार मित्रांना भरधाव ट्रकने चिरडल्याची घटना नक्षत्रवाडी येथे शुक्रवारी सकाळी ११:३० वाजेच्या सुमारास घडली. या अपघातानंतर ट्रक चालकाला पोलिसांनी अटक केली.

नवनाथ तुकाराम शेजुळ (३८) आणि एकनाथ किसन खैरे (३२, दोघे रा. तोंडोळी, ता. पैठण) या दोन मित्रांचा या घटनेत  अंत झाला.  नवनाथ हे  चितेगाव येथील स्टोन क्रेशरमध्ये काम करायचे तर एकनाथ हे ट्रॅक्टर चालक होते. नवनाथ यांना कामानिमित्त औरंगाबादला यायचे असल्याने त्यांनी जिवलग मित्र एकनाथला दुचाकीवर सोबत घेतले. तोंडोळी येथून औरंगाबादला येत असताना नक्षत्रवाडी येथे त्यांच्यामागून वेगात आलेल्या मालवाहू ट्रकने (यूपी ) त्यांना ओव्हरटेक करून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. यामध्ये ट्रकचा दुचाकीला धक्का लागला आणि मोटारसायकलसह दोन्ही मित्र खाली पडले आणि ट्रकच्या चाकाखाली आले. 

या अपघातात एकनाथ यांच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने ते घटनास्थळीच ठार झाले. तर पालथे पडलेल्या नवनाथ यांच्या पाठीवरून ट्रक गेल्याने ते गंभीर जखमी झाले. नवनाथ यांना घाटीत दाखल केले असता तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. यावेळी घटना स्थळावरून पळून गेलेल्या ट्रकचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. या अपघाताची माहिती मिळताच सातारा पोलीस ठाण्याचे निरीक्षक  सुरेंद्र माळाळे  आणि शहर  वाहतूक विभागाचे निरीक्षक मुकुंद देशमुख आणि अन्य अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

Web Title: Two close friends killed in a horrific accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.