Transfer of lands to seven industries in Auric City during the 'Unlock' period | ‘अनलॉक’ काळात ऑरिक सिटीत सात उद्योगांना केले जमिनींचे हस्तांतरण

‘अनलॉक’ काळात ऑरिक सिटीत सात उद्योगांना केले जमिनींचे हस्तांतरण

ठळक मुद्देबिडकीन इंडस्ट्रियल बेल्टला उद्योगांची प्रतीक्षारशियन स्टील उद्योग औरंगाबादेत ४३ एकरवर प्रकल्प सुरू करणारदोन टप्प्यांत तब्बल ५ हजार ८०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार

औरंगाबाद : आंतरराष्ट्रीय दर्जाच्या औद्योगिक क्षेत्रात अर्थात ‘डीएमआयसी’मधील ऑरिक सिटीत नवीन सात उद्योगांनी जमीन खरेदीची प्रक्रिया पूर्ण केली आहे. ‘अनलॉक’च्या कालावधीत या सातही उद्योगांना जागा ताब्यात दिल्या आहेत. यात रशियन स्टील उद्योग ‘नोव्होलिपेत्सक’ (एनएलएमके) या बहुराष्ट्रीय कंपनीसह सहा स्थानिक उद्योगांचा समावेश आहे. 

ऑरिक सिटीमध्ये जागेचा ताबा घेतलेल्या स्थानिक उद्योगांमध्ये अलाइन्ट स्पेशालिटी केमिकल्स प्रा. लि., टूल टेक टुलिंग, ई ॲग्रो  केअर मशिनरीज अँड इक्युपमेंट्स प्रा.लि., एस. एस. कंट्रोल्स, ५२ गेट सिटी ब्रेव्हिंग प्रा. लि, एरॉक्स टेक्नॉलॉजीस्‌  प्रा.लि. या उद्योगांचा समावेश आहे. या उद्योगांच्या माध्यमातून ‘डीएमआयसी’च्या शेंद्रा इंडस्ट्रीयल बेल्टमध्ये (ऑरिक सिटी) ट्रान्सफाॅर्मरसाठी विशेष स्टील निर्मिती, ऑटोमोबाइल, ऑक्सिजन, मद्यनिर्मितीच्या उद्योगांची भर पडणार आहे.

‘नोव्होलिपेत्सक’ (एनएलएमके) हा रशियन स्टील उद्योग औरंगाबादेत ४३ एकरवर प्रकल्प सुरू करणार असून दोन टप्प्यांत तब्बल ५ हजार ८०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.  भारतासह जगभरातील ३०-४० देशांत ही कंपनी स्टीलचा पुरवठा करते. या कंपनीच्या माध्यमातून सुमारे दीड हजार स्थानिकांना रोजगार मिळेल, तर स्थानिक सहा कंपन्यांनी या ठिकाणी ६० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. या प्रत्येक कंपनीला साधारणत: एक एकरचा प्लॉट देण्यात आला आहे. कंपन्या पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर सुमारे ४०० स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. सध्या ऑरिक सिटीमध्ये ६२ कंपन्यांनी काम सुरू केले आहे. यात पर्किन्स, ह्योसंग या बहुराष्ट्रीय उद्योगांसह काही स्थानिक उद्योजकांचाही समावेश आहे.

मोठमोठे उद्योग आणण्यासाठी प्रयत्न
ऑरिक सिटीचे सहव्यवस्थापकीय संचालक संजय काटकर म्हणाले की, अनलॉकच्या कालावधीत ऑरिक सिटीमध्ये सहा स्थानिक उद्योग व ‘एनएलएमके’ या रशियन उद्योगांना जागांचे हस्तांतरण करण्यात आले आहे. याशिवाय दोघा जणांना निवासी प्लॉटचाही ताबा देण्यात आला आहे. ‘डीएमआयसी’मध्ये ऑरिक सिटी ही अडीच हजार एकरावर विस्तारली आहे. यात उद्योग, व्यवसाय आणि निवासी जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. ‘डीएमआयसी’मध्ये देश-विदेशातील मोठमोठे उद्योग आणण्यासाठी उद्योग विभागाचे प्रयत्न सुरू आहेत.

Web Title: Transfer of lands to seven industries in Auric City during the 'Unlock' period

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.