Shocking! trader burnt by using petrol through a money dispute | पैशाच्या वादातून व्यापाऱ्याला पेट्रोल टाकून जाळले; पेटलेल्या अवस्थेतच गाठले ठाणे
पैशाच्या वादातून व्यापाऱ्याला पेट्रोल टाकून जाळले; पेटलेल्या अवस्थेतच गाठले ठाणे

ठळक मुद्देपेटलेल्या अवस्थेत पळत सुटले, लोकांनी विझविलेविश्रांती चौकातील कार्यालयात झाली घटना 

औरंगाबाद : भूखंड विक्रीच्या व्यवहारातील साडेतीन लाख रुपयांच्या वादातून तीन जणांनी एका प्लॉटिंग एजंटला त्यांच्याच कार्यालयात पेट्रोल टाकून जाळल्याची घटना विश्रांतीनगर चौकात गुरुवारी दुपारी घडली. गंभीररीत्या जळालेल्या व्यक्तीला पोलिसांनी घाटी रुग्णालयात दाखल केले आहे.

शेषराव दगडू शेंगुळे (५४, रा. जयभवानीनगर) असे जाळण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.  शेषराव हे प्लॉटिंग एजंट, लेबर कॉन्ट्रॅक्टर, तसेच बायो सायन्स उत्पादन विक्रीचा व्यवसाय करायचे. विश्रांतीनगर चौकात साई इंटरप्रायजेस नावाचे कार्यालय आहे. या कार्यालयातून ते त्यांचे सर्व व्यवहार करीत. शेंगुळे यांनी सुंदरवाडी शिवारातील त्यांचा प्लॉट स्वाती जाधव यांना साडेतीन लाख रुपयांत सहा महिन्यांपूर्वी विक्री केला होता. मात्र करारानुसार स्वाती यांचे सातबाऱ्यावर नाव आले नाही. यामुळे त्यांनी पैसे परत मागितले होते. त्यांना धनादेश दिले होते. दरम्यान, गुरुवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास शेंगुळे हे त्यांच्या कार्यालयात बसले होते. तेव्हा गजानन जाधव, पप्पू सूर्यवंशी आणि स्वाती जाधव (सर्व रा. राजनगर, मुकुंदवाडी) तेथे आले. आमचे साडेतीन लाख रुपये आताच द्या म्हणत त्यांच्यासोबत वाद सुरू केला. हे भांडण सुरू असताना त्यांच्यापैकी गजाननने सोबत आणलेल्या बाटलीतील पेट्रोल शेंगुळे यांच्या अंगावर टाकले. तर सूर्यवंशीने त्यांना पेटवून दिले. यावेळी स्वाती दारात उभी होती. यानंतर आरोपी तेथून पळून गेले. अवघ्या मिनिटांत शेंगुळे यांच्या अंगावरील कपड्यांनी पेट घेतला. यावेळी ते आरडाओरड करीत पेटलेल्या अवस्थेतच कार्यालयातून रोडपर्यंत बाहेर आले. यावेळी काही लोकांनी त्यांच्या अंगावर पाणी फेकल्याने त्यांच्या अंगाला लागलेली आग विझली. 

जबाब नोंदविल्यांनतर गुन्हा
याविषयी सपोनि. सोनवणे म्हणाले की, साडेतीन लाख रुपयाच्या वादातून काही लोकांनी शेंगुळे यांना पेट्रोल टाकून जाळल्याची प्राथमिक माहिती आहे. याविषयी रात्री उशिरा पंचासमक्ष शेंगुळे यांचा जबाब पोलिसांनी नोंदविला. याविषयी गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात सुरू होती.

दुकानदाराने दिले बेडशीट
शेंगुळे यांच्या अंगावरील संपूर्ण कपडे जळून खाक झाले आणि ते गंभीररीत्या जळाले. यावेळी त्यांच्या अंगावरील अंडरपॅण्ट अंगाला चिकटल्याने शेजारील एका दुकानदाराने कैचीने कापून अंडरपॅण्ट काढली. यानंतर त्यांना बेडशीट अंगाला गुंडाळण्यास दिले.

पायी गाठले पुंडलिकनगर ठाणे
संपूर्ण शरीर जळालेले असताना शेंगुळे हे कमरेला बेडशीट गुंडाळून पायी चालत पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गेले. ठाण्यात उपस्थित सहायक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे आणि कर्मचाऱ्यांनी त्यांना पाहताच लगेच मेडिकल मेमो तयार करून त्यांना पोलिसांच्या वाहनातून घाटी रुग्णालयात नेले.

Web Title: Shocking! trader burnt by using petrol through a money dispute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.