Shocking! Death of a reckless newborn baby girl due to dogs bite | धक्कादायक ! कुत्र्यांनी लचके तोडल्याने बेवारस नवजात नकुशीचा मृत्यू
धक्कादायक ! कुत्र्यांनी लचके तोडल्याने बेवारस नवजात नकुशीचा मृत्यू

ठळक मुद्देमृत चिमुरडीच्या डीएनएच्या आधारे तिच्या आई-वडिलांचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे

औरंगाबाद: सनी सेंटरच्या मागे मोकळ्या जागेत टाकून दिलेले एका दिवसाच्या नकुशीचे (नवजात अर्भक) मोकाट कुत्र्यांनी लचके तोडल्याने तिचा अंत झाल्याची खळबळजनक घटना १३ नोव्हेंबर रोजी सकाळी पावणे नऊ वाजेच्या उघडकीस आली. याविषयी सिडको पोलीस ठाण्यात अज्ञात माता-पित्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला.

याविषयी सिडको पोलिसांनी सांगितले की, सनी सेंटर वसाहतीमागील मोकळ्या जागेतील गवत आणि झुडपात अंदाजे एक दिवसाच्या मृत अर्भकाचे कुत्रे लचके तोडत असल्याचे बुधवारी सकाळी नागरीकांच्या निदर्शनास आले. अंगावर काटा आणणारे हे दृश्य पाहुन नागरीकांनी कुत्र्यांना पिटाळून लावले. तेव्हा मृत नकुशीचा एक हात कुत्र्यांनी तोडून नेल्याचे आणि पोट फाडून त्यातील मासाचा गोळा गायब केल्याचे दिसले. या घटनेची माहिती सिडको पोलिसांना कळविण्यात आली. गस्तीवरील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि मृत नकुशीला ताब्यात घेतले. यानंतर तिचे शव घाटीत उत्तरणीय तपासणीसाठी हलविले. पोलिसांनी मृत नकुशीच्या रक्ताच्या नमुने डि.एन.ए.तपासणीसाठी न्यायसहाय्यक प्रयोगशाळेकडे पाठविले.

याविषयी पोलीस नाईक श्रीकृष्ण सुपडू पुंड यांनी नकुशीला फेकून देणाऱ्या तिच्या निर्दयी आई-बाबांविरोधात सरकारतर्फे सिडको ठाण्यात फिर्याद दाखल केली. या गुन्ह्याचा तपास सहायक उपनिरीक्षक  पठाण आणि कर्मचारी करीत आहेत. अनैतिक संबंधातून हे बाळ जन्माला आले असावेत अथवा मुलगा हवा असताना मुलगी झाली म्हणून माता-पित्यांनी तिला बेवारस अवस्थेत फेकून दिले असावे, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला. मृत चिमुरडीच्या डीएनएच्या आधारे तिच्या आई-वडिलांचा शोध पोलिसांनी सुरू केला.

Web Title: Shocking! Death of a reckless newborn baby girl due to dogs bite

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.