सयाजी शिंदे घेऊन येत आहेत 'वृक्ष संमेलन'; पहिले संमेलन फुलणार बीडमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2020 05:24 PM2020-01-08T17:24:31+5:302020-01-08T17:53:20+5:30

विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर-अभिनेता सयाजी शिंदे यांच्यात चर्चा 

Sayaji Shinde plans 'Vruksha Sanmelan'; The first sanmelna will be in Beed | सयाजी शिंदे घेऊन येत आहेत 'वृक्ष संमेलन'; पहिले संमेलन फुलणार बीडमध्ये

सयाजी शिंदे घेऊन येत आहेत 'वृक्ष संमेलन'; पहिले संमेलन फुलणार बीडमध्ये

googlenewsNext
ठळक मुद्देसंमेलनाचे जानेवारीअखेर नियोजन प्रत्येक जिल्ह्याला मान देणार 

औरंगाबाद : अभिनेता सयाजी शिंदे यांच्या संकल्पनेतून पुढे आलेले पहिले वृक्ष संमेलन मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात जानेवारीअखेरीस होणार आहे. वृक्ष संमेलन ही नवीन संकल्पना शिंदे यांच्या वृक्ष महोत्सवातून पुढे आली असून, त्यांनी याबाबत विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्याशी मंगळवारी तासभर चर्चा केली.

अभिनेता सयाजी शिंदे यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, कदाचित वृक्ष संमेलन ही संकल्पना नवीनच असावी. तीन वर्षांपासून असे संमेलन घेण्याचा विचार होता. वृक्ष लागवड, वृक्ष ओळख, बियाणे आणि पर्यावरणासाठी वृक्षांची आवश्यकता यावर अनुभवी पर्यावरणप्रेमींनी बोलावे. पर्यावरण साहित्यिक तेथे असावेत. हे सगळे विभागातील विद्यार्थ्यांसमोर मांडावे. जेणेकरून त्यांना पर्यावरण आणि वृक्ष लागवड याचे महत्त्व समजेल. मराठवाड्यातील जंगलसंपदा अतिशय कमी आहे. अशा संमेलनातून जर वृक्ष लागवडीला चालना मिळाली, तर निश्चितपणे येणाऱ्या काही वर्षांत विभाग दुष्काळमुक्त होण्यास मदत होऊ शकेल, असे वाटते. 

बियाणे, निसर्ग अन्नसाखळी, अंकुर, फुलपाखरे आणि परागकण याची माहिती अनेकांना नसते. विद्यार्थ्यांना विविध वृक्षांच्या नावाच्या चित्रफिती दाखविण्याचा मानस आहे. विद्यार्थ्यांचा सहभाग, लोकसहभाग, चित्रकला स्पर्धा, संमेलनात स्टॉल उभारणे, वृक्षकथा, गीतांचे आयोजन करण्याबाबत आयुक्त केंद्रेकर यांच्याशी चर्चा केली. आयुक्तांनी याबाबत सकारात्मकता दर्शविली आहे. त्यांनादेखील पर्यावरण हा विषय आवडतो, त्यामुळे त्यांनी वृक्ष संमेलनाच्या नियोजनाबाबत सर्व काही समजून घेतले. 

प्रत्येक जिल्ह्याला मान देणार 
प्रत्येक जिल्ह्यात ५० हजार वृक्ष लागवड होऊन त्यांचे संगोपन चांगले होत असल्याचे दिसून आले तर त्या जिल्ह्याला वृक्ष संमेलन घेण्याचा मान देण्यात येईल. विद्यार्थ्यांचा सहभाग, तज्ज्ञांची आवास-निवास व्यवस्था करणे, यासह अनेक लहान-सहान मुद्यांवर आयुक्तांशी चर्चा केली. मराठवाड्यासाठी हा उपक्रम जंगलवाढीसाठी लाभदायी ठरावा यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे शिंदे यांनी सांगितले. 

Web Title: Sayaji Shinde plans 'Vruksha Sanmelan'; The first sanmelna will be in Beed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.