Robinhood Army of Youth Delivers Food to 95 Thousands Hungry people | ९५ हजार भुकेलेल्यांना अन्न पोहोचविणारी युवकांची ‘रॉबिनहुड आर्मी’
९५ हजार भुकेलेल्यांना अन्न पोहोचविणारी युवकांची ‘रॉबिनहुड आर्मी’

ठळक मुद्देसध्या देशातील १३० पेक्षा अधिक शहरांमध्ये हा उपक्रम सुरू आहे. २० पेक्षा अधिक सामाजिक उपक्रम 

- राम शिनगारे 

औरंगाबाद : १६ सप्टेंबर २०१८ पासून रॉबिनहुड आर्मी नावाने एकत्र आलेल्या शहरातील ३७० युवकांनी नऊ महिन्यांमध्ये ९५ हजारांहून अधिक भुकेलेल्यांना अन्नाचा घास भरविला आहे.  विविध लग्नकार्य, समारंभात शिल्लक राहिलेले अन्न भुकेलेल्यांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य शहरातील सीए, डॉक्टर, विधिज्ञांसह महाविद्यालयात शिक्षण घेत असलेले युवक करीत आहेत.

दिल्ली येथे नील घोष नावाच्या युवकाने २०१६ मध्ये शहरातील विविध कार्यक्रमांमध्ये शिल्लक राहणाऱ्या अन्नाचे वाटप करण्यासाठी २०१६ मध्ये रॉबिनहुड आर्मीची स्थापना केली. सध्या देशातील १३० पेक्षा अधिक शहरांमध्ये हा उपक्रम सुरू आहे. औरंगाबाद शहरातही रोहित इंगळे, अजिंक्य पूर्णपात्रे, नुरेन नहरी, माधवी सोनी आणि डॉ. लुबना सिद्दी यांनी एकत्र येऊन हा सामाजिक उपक्रम १६ सप्टेंबर २०१८ पासून सुरू केला. आतापर्यंत या उपक्रमात ३७० युवक जोडले गेले आहेत. हिरव्या रंगाचे टी शर्ट परिधान करून शहरातील कोणत्याही भागात कार्यक्रमाच्या स्थळी अन्न शिल्लक राहिले असल्याची माहिती समजताच या ग्रुपमधील युवक त्याठिकाणी पोहोचतात. अन्न खराब झालेले नसेल तर तात्काळ ताब्यात घेऊन रेल्वेस्थानक, घाटी परिसर, राहुलनगर, धूत हॉस्पिटलसमोर गोरगरीब भागात जाऊन वाटप करतात. या उपक्रमाला लग्नसराईत अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला असल्याचे रोहित इंगळे, सुचित शेटे यांनी सांगितले. नऊ महिन्यांत ९५ हजारांहून अधिक लोकांना शिल्लक राहिलेल्या अन्नातून पोटभर खाऊ घातले असल्याचेही इंगळे यांनी स्पष्ट केले. 

या उपक्रमासाठी कोणताही खर्च येत नाही. शिल्लक राहिलेले अन्न असते. ते आॅटोरिक्षा किंवा कोणाच्याही चारचाकी वाहनातून भुकेल्यांपर्यंत घेऊन जावे लागते. त्याठिकाणी अन्नाचे वाटप होताच युवक स्वत:च्या कामाला निघून जातात. त्यामुळे फक्त श्रम, मेहनत आणि वेळच द्यावा लागतो. हिरव्या रंगाचे टी शर्ट घातलेले युवक रेल्वेस्टेशन किंवा भुकेल्या वस्तीच्या परिसरात दिसताच अन्न घेण्यासाठी गर्दी होते. त्याच वेळी शहरातील स्वयंपाक करणाऱ्या केटरर्संनाही माहिती झाली आहे. त्यामुळे तेही अन्न शिल्लक राहिल्यास संपर्क साधून माहिती देतात, असेही रोहित इंगळे हे सांगत होते. या उपक्रमात सुचित शेटे, गौरव मेश्राम, शुभम चक्रे, नंदकुमार फुटाणे, शुभम पाटीदार, आकाश जाधव, शेखर देशपांडे, श्रुती पाटील, निधी श्रीसुंदर, वेदांत जैस्वाल आदी युवक सक्रिय सहभाग नोंदवत आहेत.

२० पेक्षा अधिक सामाजिक उपक्रम 
भुकेलेल्यांपर्यंत अन्न पोहोचविणाऱ्या रॉबिनहुड आर्मीच्या युवकांना आतापर्यंत ९ महिन्यांत २० पेक्षा अधिक सामाजिक उपक्रमही घेतले आहेत. कारगिल विजय दिनानिमित्त या युवकांनी शहराच्या विविध भागांतून तुटलेल्या, फुटलेल्या १७ सायकली गोळा केल्या. या सायकली दुरुस्तीनंतर नारेगाव येथील महापालिकेच्या शाळेतील १७ विद्यार्थ्यांना त्या वाटप केल्या. यात दहा सायकली मुलांना तर ७ सायकली मुलींना दिल्या असल्याचे सुचित शेटे यांनी सांगितले. सायकल मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसलेला आनंद हाच आमच्या सामाजिक उपक्रमाचे यश असल्याचेही हे युवक सांगतात.


Web Title: Robinhood Army of Youth Delivers Food to 95 Thousands Hungry people
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.