Rising corona reduced tourism in Aurangabad ; 80% of hotel rooms in the city are empty | वाढत्या कोरोनाने पर्यटन घटले; शहरातील हॉटेल्समधील ८० टक्के खोल्या रिकाम्या

वाढत्या कोरोनाने पर्यटन घटले; शहरातील हॉटेल्समधील ८० टक्के खोल्या रिकाम्या

ठळक मुद्देशहरात लहान-मोठे ४०० हॉटेल्स आहेत.त्यात १२ ते १५ हजार खोल्या२० हजार कर्मचाऱ्यांचा प्रश्न

औरंगाबाद : वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे भीती निर्माण झाल्याने पर्यटनाच्या राजधानीत येणाऱ्या पर्यटकांची संख्या घटली आहे. त्याचा परिणाम येथील हॉटेल व्यवसायावर झाला आहे. आजघडीला जवळपास ४०० हॉटेल्समधील ८० टक्के रूम रिकाम्या आहेत.

कोरोना जणू संपला असाच गैरसमज शहरवासीयांनी करून घेतला होता. मात्र, पुन्हा एकदा कोरोनाने कहर दाखविणे सुरू केले आहे. सध्या दररोज शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २०० पार जात आहे. याचा पहिला फटका पर्यटन उद्योगाला बसत आहे. संपूर्ण महाराष्ट्रात अशीच परिस्थिती आहे. लॉकडाऊन झाले तर पर्यटनासाठी ज्या शहरात गेलो तिथेच अडकून बसू, अशी भीती निर्माण झाल्याने पर्यटक येणे टाळत आहेत. यात ऐतिहासिक वारसा, धार्मिक पर्यटनासोबत औद्योगिक पर्यटकांची संख्याही कमालीची कमी झाली.

औरंगाबाद जिल्हा हॉटेल रेस्टॉरंट मालक संघटनेने दिलेल्या माहितीनुसार शहरात लहान-मोठे ४०० हॉटेल्स आहेत. त्यात १२ ते १५ हजार खोल्या आहेत. आजघडीला त्यातील ८० टक्के खोल्या रिकाम्या आहेत. ऑक्टोबर महिन्यात हॉटेल व्यवसाय सुरू झाला होता. जानेवारीपर्यंत बुकिंग वाढत होती. मात्र, फेब्रुवारीच्या शेवटच्या दुसऱ्या पंधरवड्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या वाढू लागली. पुन्हा एकदा हॉटेल व्यवसाय ठप्प पडण्याच्या मार्गावर आहे. मागील वर्षी लॉकडाऊनमुळे पर्यटनाला मोठा फटका बसला होता. त्यामुळे राज्यभरातून मिळणारा ५०० कोटींचा शासनाचा महसूल बुडाला होता. हॉटेल व्यावसायिकांचे कंबरडे मोडले होते. आता पुन्हा लॉकडाऊन सुरू झाले तर व्यवसायचे काय होणार, असा यक्ष प्रश्न हॉटेल व्यवसायातील व्यवस्थापनांना पडला आहे.

२० हजार कर्मचाऱ्यांचा प्रश्न
शहरात जवळपास ४०० हॉटेल्स आहेत. प्रत्येक हॉटेलमध्ये २५ ते ५० कर्मचारी काम करतात. आता लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झाली तर जवळपास २० हजार कर्मचाऱ्यांच्या पगाराचा प्रश्न व्यवस्थापनासमोर उभा राहणार आहे. बार, रेस्टॉरंटवाल्यांना तर परवाना शुल्क भरणे कठीण जाईल.
- शिवाजी पाटील, अध्यक्ष, औरंगाबाद जिल्हा हॉटेल, रेस्टॉरंट मालक संघटना

Web Title: Rising corona reduced tourism in Aurangabad ; 80% of hotel rooms in the city are empty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.