Return rainfall damages crop; there be a grant of Rs 3,000 crore in Marathwada? | परतीच्या पावसाचा फटका; मराठवाड्यात ३ हजार कोटींचे अनुदान लागणार ?
परतीच्या पावसाचा फटका; मराठवाड्यात ३ हजार कोटींचे अनुदान लागणार ?

औरंगाबाद : मराठवाड्यात परतीच्या व अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाताशी आलेल्या खरीप हंगामाची माती झाली. नुकसानीचे पंचनामे सोमवारी पूर्ण करण्यात आले. विभागातील ४८ लाख हेक्टरपैकी तब्बल ३७ लाख हेक्टरवरील पिके अवकाळी पावसामुळे गेली. केंद्राच्या नैसर्गिक आपत्ती निकषानुसार विभागाला अनुदानापोटी अंदाजे ३ हजार कोटींची गरज असल्याचा अंदाज सूत्रांनी व्यक्त केला.  

३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या ९९.१६ टक्के  हेक्टवरील पंचनामे पूर्ण झाले. शनिवारपर्यंत नुकसानीचा अहवाल शासनाकडे जाईल. दररोज ६ लाख हेक्टवरील नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. दुष्काळी अनुदानाच्या १३ मे २०१५ च्या निकषानुसार कोरडवाहू पिकांसाठी प्रतिहेक्टर ६ हजार ८००, फळबागांसाठी प्रतिहेक्टर १८ हजार तर बागायती पिकांसाठी प्रतिहेक्टर १३ हजार ५०० रुपये अनुदान देण्यात येते. त्यानुसार अहवाल तयार करण्याचे काम सुरू केले आहे.

आॅक्टोबर महिन्यातच तब्बल ३३७.८५ टक्के  अधिक पाऊस झाला असल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले. परतीच्या तसेच अवकाळी पावसाचा मराठवाड्यातील तब्बल ३४ लाख ३९ हजार शेतकऱ्यांना फटका बसला. सर्वाधिक १४ लाख २९ हजार हेक्टर सोयाबीन पिकाचे नुकसान झाले. कापूस पिकाचे ११ लाख ४२ हजार हेक्टर, मका पिकाचे २ लाख ३२ हजार हेक्टर, बाजरी ९२ हजार ५२३ हेक्टर, ज्वारी ६० हजार तर इतर पिकांचे २५ हजार हेक्टरवरील पीक पावसामुळे वाया गेले. 

Web Title: Return rainfall damages crop; there be a grant of Rs 3,000 crore in Marathwada?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.