Praised decision of the University; drought affected students education fees waived | विद्यापीठाचा स्तुत्य निर्णय; अतिवृष्टीग्रस्त विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क केले माफ

विद्यापीठाचा स्तुत्य निर्णय; अतिवृष्टीग्रस्त विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क केले माफ

ठळक मुद्देकुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी मांडला ठराव व्यवस्थापन परिषदेत झाला निर्णय  ५ हजार ८९ विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे.

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ४२ विभाग आणि उस्मानाबाद येथील १० विभागांत शिक्षण घेत असलेल्या दुष्काळ आणि अतिवृष्टीग्रस्त भागातील ५ हजार ८९ विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. याविषयीचा ठराव कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मांडला. त्यास सर्वांनुमते मंजुरी देण्यात आल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाने कळविली आहे. या ठरावामुळे विद्यार्थ्यांचे कोट्यवधी रुपयांचे शैक्षणिक शुल्क माफ होणार आहे. असा निर्णय घेणारे हे राज्यातील पहिलेच विद्यापीठ ठरले आहे.

विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात असलेल्या जिल्ह्यात अगोदर दुष्काळ आणि आता अतिवृष्टी झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या अतिवृष्टीग्रस्त भागातील विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्यासाठी त्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करण्याचा ठराव व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मांडण्याचा निर्णय घेतला होता. यानुसार अजेंड्यावर नसताना कुलगुरू  डॉ. प्रमोद येवले यांनी  शैक्षणिक शुल्क माफ करण्याचा ठराव मांडला. विद्यापीठाच्या मुख्य परिसरातील ४२ विभाग व उस्मानाबाद उपपरिसरातील दहा विभागांतील ५ हजार ८९ विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे.

बैठकीत कुलगुरू म्हणाले की, मराठवाड्यात परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकरी, कष्टकऱ्यांवर संकट आले आहे. आपले विद्यापीठ कष्टकरी कुटुंबातून आलेल्या विद्यार्थ्यांचे म्हणून ओळखले जाते. या मुलांसाठी ‘कमवा व शिका’सारखे उपक्रम राबविले जात आहेत. अनेक विद्यार्थी हे त्यांच्या कुटुंबातून पहिल्यांदाच पदव्युत्तर शिक्षणापर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे आर्थिक संकटात असलेल्या विद्यार्थ्यांचे २०१९-२० या शैक्षणिक वर्षातील शैक्षणिक शुल्क माफ करावे, असा ठराव मांडला. यानंतर सर्वच सदस्यांनी या ठरावाला अनुमोदन देत तो बहुमताने मंजूर केला. व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. राजेश करपे म्हणाले की, आम्ही हा ठराव मांडणार होतो. मात्र, कुलगुरूंनीच अतिवृष्टीची दखल घेत ठराव मांडला, हे कौतुकास्पद पाऊल आहे. त्याचे स्वागत करतो, असे स्पष्ट केले.बैठकीला प्रकुलगुरू डॉ. प्रवीण वक्ते, कुलसचिव डॉ. साधना पांडे, व्यवस्थापन परिषद सदस्य किशोर शितोळे, संजय निंबाळकर, डॉ. मुरलीधर लोखंडे, डॉ. भालचंद्र वायकर, प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख, डॉ. हरिदास विधाते, डॉ. फुलचंद सलामपुरे, डॉ. राजेश करपे, डॉ. राहुल मस्के, डॉ. नरेंद्र काळे, सुनील निकम, डॉ. अशोक देशमाने, संचालक डॉ. सतीश देशपांडे, राजेंद्र मडके, डॉ. गणेश मंझा आदींची उपस्थिती होती. 

शासन निर्णयाप्रमाणे अंमलबजावणी
शासन निर्णयाप्रमाणे दुष्काळ आणि अतिवृष्टीग्रस्त भागातील विद्यार्थ्यांनाच शैक्षणिक शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार संबंधित गावांतील विद्यार्थ्यांनाच याचा लाभ मिळेल.
-डॉ. प्रवीण वक्ते, प्रकुलगुरू

सामाजिक बांधिलकीतून निर्णय
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या नावाने चालणाऱ्या विद्यापीठात शोषित, कष्टकरी, दलित, अल्पसंख्याक, शेतकरी समाजातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर शिक्षणासाठी येतात. यावर्षी सुरुवातीला दुष्काळ आणि आता अतिवृष्टीमुळे मराठवाडा, विदर्भासह इतर भागातील शेतकऱ्यांवर आर्थिक अरिष्ट आले आहे. या कुटुंबातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात टिकून राहावे, यासाठी सामाजिक बांधिलकीतून शैक्षणिक शुल्क माफीचा निर्णय घेतला आहे.
-डॉ. प्रमोद येवले, कुलगुरू

Web Title: Praised decision of the University; drought affected students education fees waived

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.