‘एक वही भावासाठी, एक पुस्तक बहिणीसाठी’; पूरग्रस्त विद्यार्थ्यांसाठी अनोखा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2019 06:57 PM2019-08-19T18:57:30+5:302019-08-19T19:00:19+5:30

माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांचा उपक्रम

'One notebook for brother, one book for sister'; Activities for flood affected students in Aurangabad | ‘एक वही भावासाठी, एक पुस्तक बहिणीसाठी’; पूरग्रस्त विद्यार्थ्यांसाठी अनोखा उपक्रम

‘एक वही भावासाठी, एक पुस्तक बहिणीसाठी’; पूरग्रस्त विद्यार्थ्यांसाठी अनोखा उपक्रम

googlenewsNext
ठळक मुद्दे शालेय साहित्य कोल्हापूर, सांगली आणि साताराच्या शिक्षणाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात येईल.

औरंगाबाद : सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांत सर्वस्व गमावलेल्या नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. या नागरिकांच्या पाल्यांच्या शाळा येत्या आठ दिवसांत उघडल्या जातील. तेव्हा या बालकांना शाळेत जाण्यासाठी वही, पेन, पुस्तक, कंपास आदी शालेय साहित्य असणार नाही. या तिन्ही जिल्ह्यांतील प्रत्येक विद्यार्थ्याला शाळेत येताच हे साहित्य मिळावे, यासाठी औरंगाबाद माध्यमिकचे शिक्षणाधिकारी डॉ. बी.बी. चव्हाण यांनी एक अभिनव उपक्रम सुरूकेला आहे. ‘एक वही भावासाठी, एक पुस्तक बहिणीसाठी’ उपक्रमांतर्गत शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांनी शालेय साहित्य आणून मुख्याध्यापकांकडे जमा करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

पश्चिम महाराष्ट्रात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. यात राज्यातील नागरिक, शासनाकडून जीवनावश्यक वस्तूंची मदत पोहोचविण्यात येत आहे. येत्या आठ-दहा दिवसांत जनजीवन सुरळीत होईल. गावांमधील शाळा उघडल्या जातील. शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांची घरे आठ दिवसांपासून पाण्यात होती. त्यामुळे घरातील प्रत्येक वस्तू नष्ट झाली आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे शालेय साहित्यही पावसाने हिरावून घेतले आहे. अगोदरच या भागातील नागरिकांचे जीवन जगण्याचे वांधे झालेले असल्यामुळे या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य मिळणे कठीण आहे. राज्यभरातून विद्यार्थ्यांच्या शालेय साहित्याविषयी मदत करण्यात येत नाही. त्यामुळे आपल्या  भावा-बहिणींसाठी औरंगाबाद जिल्ह्यातील प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रत्येकी एक वही, एक पुस्तक, कंपास साहित्य आणावे. हे साहित्य पुरात शालेय साहित्य वाहून गेलेल्या आपल्या बहीण, भावांसाठी पाठविण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी आणलेले शालेय साहित्य मुख्याध्यापकांनी एकत्र जमा करून घ्यावे, हे जमलेले साहित्य वस्तूनुसार वेगवेगळे करून माध्यमिक शिक्षणाधिकारी, चेलीपुरा हायस्कूल, स्टेशन रोड येथे आणून द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले. विद्यार्थ्यांकडून जमा झालेले हे शालेय साहित्य कोल्हापूर, सांगली आणि साताराच्या शिक्षणाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात येईल. तेथून ते साहित्य प्रत्येक शाळेत पाठविले जाईल, असेही डॉ. चव्हाण यांनी स्पष्ट केले.

उपक्रमशील शिक्षणाधिकारी म्हणून नावलौकिक
जि.प. माध्यमिकचे शिक्षणाधिकारी डॉ. बी. बी. चव्हाण हे नियमितपणे विविध उपक्रम राबवत असतात. दहावी-बारावी परीक्षेच्या काळात विविध केंद्रांना भेटी देऊन त्यांनी कॉपी रोखण्यावर भर दिला होता. ४यात मोठ्या कारवाईसुद्धा केल्या आहेत. यावर्षी शाळा भरताच त्यांनी मुख्याध्यापक, संस्थाचालकांची बैठक घेत कॉपीमुक्तीसाठी आतापासून प्रयत्न सुरू आहेत.४ तसेच प्रत्येक विद्यार्थी, शिक्षकांना मदत करणे, उपक्रम राबविण्यातही त्यांचा नावलौकिक आहे. यावेळी त्यांनी सामाजिक भान जपत पूरग्रस्तांसाठी साहित्य जमा करण्याचा उपक्रम सुरू केला आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील विविध भागात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीत सर्वजण नागरिकांना वेगवेगळ्या प्रकारची मदत करत आहेत. आपण शिक्षण क्षेत्रात कार्यरत असल्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य उपलब्ध करून देणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. त्यामुळे हा उपक्रम सुरू केला आहे. यात समाजातील घटकही सहभागी झाल्यास त्यांचेही स्वागतच करूत. तरी जास्तीत जास्त नागरिक, विद्यार्थ्यांना आपल्या भावा-बहिणींसाठी एक वही, एक पुस्तक घेऊन येतील असा विश्वास आहे.
- डॉ. बी.बी. चव्हाण, माध्यमिक शिक्षणाधिकारी, औरंगाबाद

 

Web Title: 'One notebook for brother, one book for sister'; Activities for flood affected students in Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.