No DJs, no drums in Navratri; Garba, Dandiya will be released by the citizens | नवरात्रौत्सवात ना डीजे, ना ढोल; गरबा, दांडियाला नागरिक मुकणार

नवरात्रौत्सवात ना डीजे, ना ढोल; गरबा, दांडियाला नागरिक मुकणार

ठळक मुद्देमंडळांचे यंदा सामाजिक उपक्रम रोजगारावर परिणाम

औरंगाबाद : अधिक मास संपून उद्या शनिवारपासून नवरात्रौत्सवाला सुरुवात होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जसा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला, तशीच सार्वजनिक  मंडळे नवरात्रौत्सव प्रशासनाने दिलेल्या सर्व नियमांचे पालन करून अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करणार आहेत. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळांची गरबा खेळण्याची ५९ वर्षांची परंपरा यंदा खंडित करावी लागत आहे. सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळे ६ ते १० फुटांपेक्षा जास्त देवीची मूर्ती बसवत नसत. यंदा मूर्तीची उंची ४ फूटच ठेवण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या परवानगीनुसार रस्त्यावर, कडेला किंवा रिकाम्या जागेत मर्यादित स्वरूपाचे मंडप उभारण्यात आले आहेत. यंदा नवरात्रात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. यामुळे मंडप टाकताना त्याची काळजी घेण्यात आली आहे. मंडपात भाविक व कार्यकर्ते यांच्यासाठी सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात येणार आहे. कोरोना व शासनाने घालून दिलेल्या अटी, नियमामुळे सार्वजनिक मंडळाची संख्या घटली आहे. काही जुन्या मंडळांनी परंपरा चालून ठेवण्यासाठी देवीची स्थपना करण्याचा निर्णय दोन दिवस अगोदर घेतला आहे. 

मंडळे घेणार खबरदारी
शहर व परिसरातील विविध नवरात्रौत्सव मंडळांनी कोरोनाचा संसर्ग टाकण्यासाठी सरकारने दिलेल्या नियमनाचे पालन करण्याचे ठरवले आहे. अनेक ठिकाणी लहान मंडप उभारण्यात आला आहे. जास्तीत जास्त ५ कार्यकर्ते बसतील एवढीच जागा ठेवण्यात आली आहे. दररोज मंडपांचे निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे. आरती व भजनासाठी येणाऱ्यांना सॅनिटायझर ठेवण्यात येणार आहे.

मंडळांचे यंदा सामाजिक उपक्रम 
कोरोनामुळे सरकारने सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळांना आरोग्य विषयक उपक्रम राबविण्याचे आवाहन केले आहे. यामुळे मंडळे फक्त देवीची मूर्तीची स्थापणार आहेत. सकाळी व संध्याकाळी देवीची आरती व दुपारी भजन कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. काही मंडळे रक्तदान शिबीर घेणार आहेत.

रोजगारावर परिणाम
नवरात्रौत्सवात कर्णपुरा यात्रेत दीड हजार लोकांना हंगामी रोजगार मिळतो. त्यातून १२ कोटींची उलाढाल होते. यंदा यात्रा रद्द करण्यात आल्याने हा व्यवसाय बुडाला आहे. गरबा व दांडियाच्या आयोजनात ४ ते ५ कोटींची उलाढाल होत असते. ती यंदा होणार नाही.  

कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी अजूनही धार्मिक स्थळे बंद आहेत. कोरोनामुळे नवरात्रौत्सवात गरबा आयोजनाला परवानगी नाही. विनापरवानगी गरब्याचे आयोजन करणाऱ्या मंडळाचे अध्यक्ष आणि सचिवांवर गुन्हे दाखल केले जातील.  
-डॉ. निखिल गुप्ता, पोलीस आयुक्त

Web Title: No DJs, no drums in Navratri; Garba, Dandiya will be released by the citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.