गुन्हेगारांचे कर्दनकाळ; नवे सीबीआय प्रमुख सुबोधकुमार जयस्वाल यांचे औरंगाबादवर विशेष प्रेम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 01:37 PM2021-05-27T13:37:25+5:302021-05-27T13:44:20+5:30

CBI Chief Subodh Kumar Jaiswal १९८५ बॅचचे आयपीएस असलेल्या जयस्वाल यांनी औरंगाबादमध्ये एक वर्ष प्रशिक्षणार्थी सहाय्यक पोलीस अधीक्षक (एएसीपी) म्हणून काम केल्यानंतर त्यांना पहिली नियुक्तीही येथेच देण्यात आली होती.

New CBI chief Subodh Kumar Jaiswal's special love for Aurangabad | गुन्हेगारांचे कर्दनकाळ; नवे सीबीआय प्रमुख सुबोधकुमार जयस्वाल यांचे औरंगाबादवर विशेष प्रेम

गुन्हेगारांचे कर्दनकाळ; नवे सीबीआय प्रमुख सुबोधकुमार जयस्वाल यांचे औरंगाबादवर विशेष प्रेम

googlenewsNext
ठळक मुद्दे१९८६ मध्ये शाहगंज भागात उसळलेल्या दंगलीत जयस्वाल यांनी खूप मोलाची भूमिका बजावली.शहरातील व्हाईट कॉलर दादा, मटका किंग आदींवर हात टाकण्याचे धाडस जयस्वाल यांनीच केले. मोठ्या गुन्हेगारांची संपूर्ण पाळेमुळे त्यांनी खोदून काढली. त्यानंतर एकाही गुन्हेगाराला डोके वर काढता आले नाही.

- मुजीब देवणीकर

औरंगाबाद : सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन अर्थात सीबीआयच्या संचालकपदी नव्याने नियुक्त झालेले सुबोधकुमार जयस्वाल यांनी पोलीस खात्यात आपल्या कारकिर्दीची सुरुवात औरंगाबादमधून केलेली असून, त्यांची औरंगाबादमधील कारकीर्द चांगलीच गाजली आणि ती सर्वांच्याच लक्षात राहिली. जयस्वाल यांचे औरंगाबादवर विशेष प्रेम आहे.

१९८५ बॅचचे आयपीएस असलेल्या जयस्वाल यांनी औरंगाबादमध्ये एक वर्ष प्रशिक्षणार्थी सहाय्यक पोलीस अधीक्षक (एएसीपी) म्हणून काम केल्यानंतर त्यांना पहिली नियुक्तीही येथेच देण्यात आली होती. तीन वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी औरंगाबादेतील गुन्हेगारी विश्वावर जरब बसवली होती. त्यांचा पहिला मुलगाही औरंगाबादमध्येच जन्मला, त्यामुळेही जयस्वाल यांना औरंगाबादबद्दल आत्मियता आहे.

तत्कालीन पोलीस अधीक्षक भुजंगराव मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली जयस्वाल १९८५ मध्ये ऐतिहासिक औरंगाबाद शहरात प्रशिक्षणार्थी आयपीएस म्हणून दाखल झाले. अत्यंत कडक आणि शिस्तप्रिय असलेल्या जयस्वाल यांनी आपल्या कामाची चुणूक पहिल्या बारा महिन्यांतच दाखवून दिली. त्यामुळे गृह मंत्रालयाने त्यांना याचठिकाणी सहाय्यक पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती दिली. १९८६ मध्ये शाहगंज भागात उसळलेल्या दंगलीत जयस्वाल यांनी खूप मोलाची भूमिका बजावली. सिटी चौक, कासारी बाजार भागात भरणारे मीना बाजार शहागंजमध्ये नेण्याचे श्रेय जयस्वाल यांना जाते. त्याकाळात गुन्हेगारी विश्वातील अनेक ‘बेताज बादशाह’ आपल्या धंद्यात मोठे होत होते. त्यांच्या अड्ड्यांवर जाण्याची हिंमत एकही पोलीस अधिकारी करू शकत नव्हता. व्हाईट कॉलर दादा, मटका किंग आदींवर हात टाकण्याचे धाडस जयस्वाल यांनीच केले. मोठ्या गुन्हेगारांची संपूर्ण पाळेमुळे त्यांनी खोदून काढली. त्यानंतर एकाही गुन्हेगाराला डोके वर काढता आले नाही. गुन्हेगारांकडून कोणत्या पोलीस अधिकाऱ्याला किती हप्ता दिला जातो, याची डायरीच जयस्वाल यांनी हस्तगत केली होती. सिटी चौक पोलीस ठाण्यात बसून त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढल्याची आठवण आहे.

अल्पावधीत प्रचंड जरब
सुबोधकुमार जयस्वाल यांच्या नावाची त्याकाळात शहरातील गुन्हेगारांवर जरब निर्माण झाली होती. त्यांच्यासमोर शर्टाचे वरचे बटन उघडे ठेऊन जाण्याची कोणाचीही हिंमत नसे. तसे दिसल्यास ते त्या व्यक्तीचा खरपूस समाचार घेत. त्याकाळी हिप्पी केसांची फॅशन होती. त्यामुळे असे केस असणाऱ्या व टवाळगिरी करणाऱ्या तरुणांचे ते जाहीररित्या मुंडन करत असत. तरुणींची छेडछाड करणाऱ्या रोडरोमिओंचाही त्यांनी बंदोबस्त केला होता.

औरंगाबादबद्दल जिव्हाळा
१९८६ आणि ८८ सालामध्ये झालेल्या दंगली हाताळण्यात सुबोधकुमार जयस्वाल यांनी मोलाची भूमिका बजावली होती. त्यांचे औरंगाबाद शहरावर विशेष प्रेम आहे. महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक असताना त्यांनी मुंबईत ईद मिलन कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी त्यांनी औरंगाबाद शहरातून मोजक्या पाचजणांना निमंत्रित केले होते.
- रशीद मामू, माजी महापौर

गुन्हेगार नावानेच थरकाप करायचे
अल्पावधीत जयस्वाल यांनी गुन्हेगारी जगताची पाळेमुळे नष्ट केली होती. गुन्हेगार अक्षरश: त्यांच्या नावाने थरकाप करत असत. अधिकारी-कर्मचारीही अत्यंत शिस्तीने वागत होते. त्यांच्या काळात सर्वसामान्यांना न्याय मिळाल्याचे चित्र शहरात दिसले.
- अब्दुल कदीर, ज्येष्ठ पत्रकार

जिगरबाज अधिकारी
जयस्वाल औरंगाबादेत एएसपी असताना मी उपनिरीक्षक होतो. जुळ्या शहरात मोठमोठ्या अड्ड्यांवर धाडी टाकल्या. त्यांच्या नेतृत्वात काम करण्याची संधी मिळाली. जिगरबाज अधिकारी अशी त्यांची ओळख होती.
- जीवन मुंडे, निवृत्त पोलीस उपनिरीक्षक.

Web Title: New CBI chief Subodh Kumar Jaiswal's special love for Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.