तरुणीच्या अपहरणाच्या संशयातून शेजारील युवकाची हत्या; घटनेनंतर गावात तणावपूर्ण शांतता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 14:06 IST2020-03-16T14:01:22+5:302020-03-16T14:06:19+5:30
संशयावरून तरुणाच्या अल्पवयीन भावाचा तीक्ष्ण हत्याराने खून आणि त्याच्या आई-वडिलांना गंभीर जखमी केले

तरुणीच्या अपहरणाच्या संशयातून शेजारील युवकाची हत्या; घटनेनंतर गावात तणावपूर्ण शांतता
वैजापूर (जि. औरंगाबाद) : प्रेम प्रकरणातून तरुणीचे अपहरण केल्याच्या संशयावरून तरुणाच्या अल्पवयीन भावाचा तीक्ष्ण हत्याराने खून आणि त्याच्या आई-वडिलांना गंभीर जखमी केल्याच्या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली असून, गावात तणावपूर्ण शांतता आहे.
या घटनेतील २० वर्षांची तरुणी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांत शुक्रवारी दाखल आहे. भीमराजचा मोठा भाऊ अमोल बाबासाहेब गायकवाड याने प्रेम प्रकरणातून तिचे अपहरण केल्याचा संशय देवकर कुटुंबियांना होता. अमोलदेखील शुक्रवारपासून गावात नाही. अमोलचे कुटुंब लाख खंडाळा गावापासून सहा कि.मी. अंतरावरील वस्तीवर राहते तर देवकर यांचे घर लाख खंडाळा येथे आहे. तरुणीचे अपहरण झाल्याच्या संशयातून देवीदास व रोहिदास हे दोघे तलवारीसारखे तीक्ष्ण हत्यार घेऊन शनिवारी रात्री आठवाजेच्या सुमारास वस्तीवर धडकले. बाहेर झोपलेल्या भीमराजवर हल्ला करून दोघांनी त्याला ठार केले व नंतर आई -वडिलांनाही जखमी केले.
माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी रात्रीच घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. याप्रकरणी अलकाबाई गायकवाड यांच्या फिर्यादीवरून देवीदास देवकर व रोहिदास देवकर या दोघांविरुद्ध वैजापूर पोलीस ठाण्यात खून व अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांनाही अटक करण्यात आली आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी गोपाळ रांजणकर करीत आहेत.
राखीव पोलिसांची तुकडी तैनात
घटटनेनंतर गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून, राखीव पोलिसांच्या तुकडीसह दंगा काबू पथकाला पाचारण करण्यात आले आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणाखाली असून, गावात शांतता आहे, अशी माहिती उपविभागिय पोलीस अधिकारी गोपाल रांजणकर यांनी दिली.