Lockdown deprives jobs; The youth lost his life in an accident while working as a driver near the village | लॉकडाऊनमुळे रोजगार हिरावला; गावाकडे चालकाचे काम करताना तरुणाने अपघातात जीव गमावला

लॉकडाऊनमुळे रोजगार हिरावला; गावाकडे चालकाचे काम करताना तरुणाने अपघातात जीव गमावला

सोयगाव : लॉकडाऊनमुळे सुरत येथील एका कारखान्यात काम करणाऱ्या तरुणाची नोकरी गेली. गावी परतून कुटुंबास हातभार लावण्यासाठी ट्रॅक्टरवर चालक म्हणून काम सुरु केले. मात्र नांगरटी करतांना ट्रॅक्टर विहिरीत कोसळ्याने तरुणाने जीव गमावल्याची दुःखद घटना गुरुवारी (दि. २८) मध्यरात्री गोंदेगाव (ता.सोयगाव) येथे घडली. सागर चिंतामण देसले (२४) असे तरुणाचे नाव आहे. 

घरची परिस्थिती हलाखीची असल्याने सागर सुरत येथील एका कारखान्यात काम करत होता. लॉकडाऊनमुळे नौकरी जाऊन तो बेरोजगार झाल्याने मागील आठवडय़ात गावी परतला होता. घरी रिकामे बसण्यापेक्षा ट्रॅक्टर चालविता येत असल्याने त्याने गावातीलच एका  शेतकऱ्याच्या ट्रॅक्टरवर चालक म्हणून काम सुरु केले होते. गुरुवारी सायंकाळी ९ वाजता मुखेड शिवारातील गट क्रमांक ९१ मधील सुभाष बोरसे यांच्या शेताची नांगरटी करण्याकरीता गेला. रात्रभर नांगरटी केल्यानंतर पहाटे शेतकरी आणि बरोबर आलेला चालक झोपी गेल्यानंतर सागरने एकट्यानेच काम चालूच ठेवले होते.

नांगरटी अंतिम टप्प्यात असतांनाच ट्रॅक्टर मागे घेताना ते विहीरीत कोसळले. यावेळी सागर विहिरीतील पाण्यात बुडाला व त्यावर ट्रॅक्टर पडले. यामुळे गुदमरून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.  घटनेची माहिती मिळाल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाली ठाणे अंमलदार योगेश झाल्टे, सतीश पाटील, दिपक पाटील, विकास दुबीले यांनी घटनास्थळी भेट दिली. शवविच्छेदनानंतर सायंकाळी पोलीस बंदोबस्तात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: Lockdown deprives jobs; The youth lost his life in an accident while working as a driver near the village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.