माणुसकीचे दर्शन ! कोरोनाबाधित भावंडांच्या वृद्ध वडिलांवर डॉक्टरांनी केले अंत्यसंस्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2020 01:54 PM2020-08-13T13:54:27+5:302020-08-13T13:59:08+5:30

वाळूज एमआयडीसीतील एका कंपनीत काम करणारे दोन्ही भावंडे कोरोना पॉझिटिव्ह आल्याने कोविड सेंटरमध्ये उपचार घेत आहेत.

Humanity ! Doctors performed funerals on the elderly father of the corona positive siblings in Aurangabad | माणुसकीचे दर्शन ! कोरोनाबाधित भावंडांच्या वृद्ध वडिलांवर डॉक्टरांनी केले अंत्यसंस्कार

माणुसकीचे दर्शन ! कोरोनाबाधित भावंडांच्या वृद्ध वडिलांवर डॉक्टरांनी केले अंत्यसंस्कार

googlenewsNext
ठळक मुद्देवयोवृद्ध वडिलांचे निधन झाले.घरी केवळ महिला आणि लहान मुले होतीनातेवाईकांनी फिरवली पाठ

वाळूज महानगर : दोन कर्ती मुले  कोरोनाबाधित  होऊन  रुग्णालयात दाखल झालेली. घरी फक्त महिला व लहान मुले. त्यात या भावंडांच्या वयोवृद्ध वडिलांचे निधन झाले. कोरोनाच्या धास्तीने शेजारी व नातेवाईकही जवळ फिरकेनात. मग कोविड सेंटरमधील डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. माणुसकीचे हे दर्शन बुधवारी (दि.१२) रांजणगाव शेणपुंजीत घडले. 

वाळूज एमआयडीसीतील एका कंपनीत हे दोन्ही भावंडे काम करतात. काही दिवसांपूर्वी कंपनी व्यवस्थापनाने सर्व  कामगारांना कोरोनाची तपासणी करण्याचे आदेश  दिले. मंगळवारी (दि.११) केलेल्या अँटिजन चाचणीत हे दोघे भाऊ कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्या दोघांना औरंगाबाद- नगर महामार्गावरील आयसीएम महाविद्यालयाच्या कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. तिकडे त्यांच्या वयोवृद्ध वडिलांचे बुधवारी (दि.१२) निधन झाले. घरातील कर्ते दोन्ही पुरुष पॉझिटिव्ह आणि कुटुंबात फक्त महिला व लहान मुलेच. त्यामुळे अंत्यसंस्कार करण्यासाठी काही काळ घरी जाण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती त्यांनी कोविड सेंटरमधील डॉ. संतोष कुलकर्णी यांना केली. मात्र, इतरांनाही संसर्ग होण्याची भीती असल्यामुळे त्यांनी परवानगी नाकारली.

डॉ. कुलकर्णी हे कोविड सेंटरमधील कर्मचारी सतीश पठाडे, अर्जुन साखरे यांना सोबत घेऊन बुधवारी सकाळी ८ वा. कोरोनाबाधित भावंडांच्या घरी पोहोचले. कोरोनाच्या भीतीने नातेवाईक व शेजारीही अंत्यसंस्कार करण्यासाठी मदत करीत नसल्याचे त्यांनी पाहिले. डॉ. कुलकर्णी यांनी अंत्यसंस्कारासाठी लागणाऱ्या साहित्याची स्मशानभूमीत व्यवस्था केली. अंत्यसंस्कारासाठी पार्थिव रुग्णवाहिकेतून नेण्यात आले. नातू दत्ता याने आजोबाच्या चितेला अग्नी दिला.  तेव्हा डॉ. संतोष कुलकर्णी, डॉ. विशाल उईके, सतीश पठाडे, अर्जुन साखरे, आरोग्यसेवक गणेश दुरोळे व मृताच्या कुटुंबातील तिघे, असे ७ जण उपस्थितीत होते.
 

Web Title: Humanity ! Doctors performed funerals on the elderly father of the corona positive siblings in Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.