History Updating Science; Accept it | इतिहास अपडेट होणारे शास्त्र; त्याचा स्वीकार करावा

इतिहास अपडेट होणारे शास्त्र; त्याचा स्वीकार करावा

औरंगाबाद : इतिहासावर सर्व बाजूंनी कायम संशोधन सुरू असते. यातून नव्या गोष्टी पुढे येतात. यामुळे इतिहास हे कायम अपडेट होणारे शास्त्र असून, त्याचा सर्वांनी स्वीकार करायला हवा, असा स्वर ‘इतिहास आणि चित्रपटविषयक स्वातंत्र्य’ या विषयावरील परिसंवादातून उमटला. सातव्या औरंगाबाद फिल्म फेस्टिव्हलमध्ये गुरुवारी ( दि.६) आयोजित या परिसंवादात पटकथा लेखक चिन्मय मांडेलकर, दिग्दर्शक ओम राऊत, प्रसाद ओक आणि दिग्पाल लांजेकर या सिनेसृष्टीतील दिग्गजांनी परखड मते मांडली. 

परिसंवादात सुरुवातीलाच ऐतिहासिक सिनेमा निर्मितीच्या मागची काय प्रेरणा असते यावर मान्यवरांनी मते मांडली. यात ओम राऊत आणि दिग्पाल लांजेकर यांनी हॉलिवूड चित्रपटापासून प्रेरणा घेऊन आपला देदीप्यमान इतिहाससुद्धा अशाच प्रकारे पुढे आणण्याची प्रेरणा मिळाल्याचे सांगितले. तर कोणत्याही काळातील आईची बाळाबद्दलची ओढ दाखविण्यासाठी हिरकणीची निर्मिती झाल्याचे प्रसाद ओक यांनी सांगितले. तसेच चित्रपटात कधी कधी इतिहासाची मोडतोड ही पटकथेची गरज म्हणून केली जाते. मात्र यातून इतिहास प्रभावानेच मांडला जावा हाच हेतू असतो, असेही मान्यवर म्हणाले. यासोबतच ऐतिहासिक चित्रपटातील गाणी ही आगंतुक नसून कथेला पुढे नेण्याची योजना असते, असेही सर्वांनी स्पष्ट केले. 

आम्ही ‘सॉफ्ट टार्गेट’
कुठल्याही ऐतिहासिक चित्रपटाचे पोस्टर, ट्रेलर आले की वाद ठरलेला आहे. विषयाचा अभ्यास न करता त्यावर लगेच सोशल मीडियातून व्यक्त होण्याने अडचणी वाढत आहेत. कथा, त्यावर अभ्यास, पटकथा, निर्माता आणि नंतर चित्रपट पडद्यावर येण्यास खूप कालावधी जातो. यात कष्ट असतात. मात्र प्रसिद्धीसाठी आम्ही ‘सॉफ्ट टार्गेट’ असल्याने काही जण वाद पेटवतात. इतिहासात राजकारण घुसल्याने विपरित परिस्थिती उद्भवते, असे मत दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी मांडले. 

आगामी काळात ८ ऐतिहासिक चित्रपटांची मेजवानी 
सिनेमातून इतिहासाचा अर्थबोध झाला पाहिजे. यातून खरी गोष्ट सांगता आली पाहिजे. तसेच चित्रपटातून रोमान्स की इतिहास नेमके काय दाखवायचे हे दिग्दर्शकाचे स्वातंत्र्य आहे, असेही दिग्दर्शक दिग्पाल म्हणाले. यासोबतच शिवाजी महाराजांच्या पराक्रमावरील चित्रपट निर्मितीची प्रक्रिया सुरूअसून, आम्ही ८ ऐतिहासिक चित्रपटांची मालिकाच करीत आहोत, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. 

Web Title: History Updating Science; Accept it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.