The glow of this khaki is different; Police Inspector Riding on the bicycle from 35 years | या खाकीची चमक न्यारी; ३५ वर्षांपासून फौजदाराची सायकलवरच सवारी  

या खाकीची चमक न्यारी; ३५ वर्षांपासून फौजदाराची सायकलवरच सवारी  

ठळक मुद्दे३५ वर्षांत बदलली एक सायकल १९८४ पासून सायकलवरच घर ते पोलीस ठाणे असा प्रवास

- बापू सोळुंके 

औरंगाबाद : पोलीस म्हटले की, ढेरपोट्या पोलिसांचे चित्र डोळ्यासमोर येते. बारा-बारा तास काम करताना पोलिसांना स्वत:च्या प्रकृतीकडे लक्ष देता येत नाही. परिणामी त्यांना शारीरिक व्याधी जडतात, असे म्हटले जाते. शहर पोलीस दलातील सहायक फौजदार युसूफ खान रहिम खान पठाण हे यास अपवाद आहेत. सलग ३५ वर्षांपासून सायकलवर घर ते ड्यूटी असा प्रवास ते करतात. एवढेच नव्हे तर वेळप्रसंगी ते सायकलवरच गस्तही करतात. सायकलप्रेमामुळे युसूफ खान यांना कोणताही आजार स्पर्श करू शकला नाही.  

उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकाराची लक्षणे दिसू लागल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर सायकल चालविण्याचा व्यायाम करताना बरीच मंडळी दिसतात. काही जण हौसेखातरही सायकलिंग करतात. मात्र चांगला पगार असूनही शारीरिक तंदुरुस्तीसाठी आणि देशाचे इंधन बचत व्हावे, या उद्देशाने आयुष्यभर जर कोणी सायकल चालवीत असेल तर तुम्ही विश्वास ठेवणार नाही. मात्र औरंगाबाद शहर पोलीस दलातील बेगमपुरा ठाण्यात कार्यरत असलेले सहायक फौजदार युसूफ खान पठाण हे असे व्यक्तिमत्त्व आहे की, १९८४ पासून आजपर्यंत ते सायकलवरच घर ते पोलीस ठाणे, पोलीस 
आयुक्तालय, पोलीस मुख्यालय ये-जा करीत असतात. पोलीस दलात रुजू झाले तेव्हा त्यांनी एक सायकल खरेदी केली. त्यावेळी त्यांचे अनेक सहकारी सायकल वापरत होते. मात्र कालांतराने पगार वाढला आणि पोलिसांनी मोटारसायकल, स्कूटर आणि कारचा वापर सुरू केला.

युसूफ पठाण यांचे अनेक मित्र स्वयंचलित वाहने वापरतात.  युसूफ खान यांनी मात्र सायकलचा वापर बंद केला नाही. याविषयी त्यांना विचारले असता ते म्हणाले की, सायकलीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. सायकल चालविणाऱ्या व्यक्तीचा शारीरिक व्यायाम चांगला होतो. शिवाय सायकलीकरिता कोणतेही इंधन लागत नाही. एवढेच नव्हे तर दुरुस्तीचा खर्चही किरकोळ असतो. आजच्या धावपळीच्या युगात लोकांनी सायकल सोडून स्वयंचलित वाहनांचा वापर सुरू केला आणि सायकल वापर कमी झाला. मित्रांसोबतच वरिष्ठ अधिकारीही मी जेव्हा सायकलवरून कामावर येतो हे पाहून आश्चर्यचकित होतात. वयाची ५६ वर्षे ओलांडत असताना आपण सायकलमुळे शारीरिकदृष्ट्या अत्यंत तंदुरु स्त आहे. रक्तदाब, मधुमेहसह कोणताही आजार नाही. माझ्या मते नियमित सायकल चालवीत असल्यानेच हे आजार आपल्यापासून दूर आहेत. 

३५ वर्षांत बदलली एक सायकल 
युसूफ खान पठाण हे सध्या बेगमपुरा पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. तत्पूर्वी ते जिन्सी ठाणे आणि त्याआधी  पोलीस मुख्यालयात होते. पोलीस शिपाई ते सहायक उपनिरीक्षक, अशा ३५ वर्षांच्या प्रवासात त्यांनी केवळ एक सायकल बदलली. पहिल्या सायकलचे अपघातात नुकसान झाल्यानंतर त्यांनी दुसरी सायकल खरेदी केली. ही सायकल खरेदी करून त्यांना सुमारे नऊ वर्षे झाले. बऱ्याचदा वरिष्ठांसोबत त्यांच्या वाहनातून जावे लागते तेव्हा सायकल उभी करावी लागते. युसूफ खान यांच्या मते शारीरिक तंदुरुस्तीसाठी प्रत्येकाने सायकल वापरणे गरजेचे आहे.
 

Web Title: The glow of this khaki is different; Police Inspector Riding on the bicycle from 35 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.