fire breaks out in Aurangabad manoj automobile shop | औरंगाबादमध्ये गॅरेजला भीषण आग
औरंगाबादमध्ये गॅरेजला भीषण आग

औरंगाबाद - गारखेडा परिसरातील विजयनगर रोडवरील मनोज ऑटोमोबाईल या गॅरेजला रविवारी सकाळी शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. संपूर्ण दुकान आगीत जळून खाक झाले असून सुमारे दहा ते पंधरा लाखांचे नुकसान झाल्याची माहिती दुकान मालकाने दिली आहे.

गारखेडा परिसरातील विजयनगर रस्त्यावरील हिंदुराष्ट्र चौकात मनोज सूर्यवंशी यांचे मनोज ऑटोमोबाईल नावाचे गॅरेज आहे. शनिवारी रात्री दुकान बंद करून ते घरी गेले. रविवारी (17 नोव्हेंबर) सकाळी सात वाजेच्या सुमारास गॅरेजमधून धूर निघत असल्याचे मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांना दिसले. त्यांनी या घटनेची माहिती अग्निशमन विभागाला कळविली.

सेवन हिल अग्निशमनचे जवान बंबासह घटनास्थळी दाखल झाले. यानंतर त्यांनी आग विझविण्यास प्रयत्न केले. मात्र गॅरेजमधील ऑईलचे डब्बे फुटल्याने आगीने अधिकच भडका घेतला. हे पाहून अन्य बंब आणि जवान मदतीसाठी बोलावण्यात आले. तासाभराच्या प्रयत्नानतर आग आटोक्यात आली. मात्र तोपर्यंत संपूर्ण दुकानातील सामान जळून खाक झाले. आग लागल्याने दुकानातून निघालेल्या धूराचे लोळ दूरपर्यंत दिसत होते. घटनेची माहिती मिळताच पुंडलिक नगर ठाण्याचे पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि बघ्यांची गर्दी हटविली. या घटनेत सुमारे पंधरा लाखांचे दुकानातील माल आणि फर्निचर, रॅक जळाल्याचे दुकानमालक मनोज यांनी सांगितले आहे.
 

Web Title: fire breaks out in Aurangabad manoj automobile shop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.